खासदार राहुल शेवाळे यांनी काल लोकसभेत अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणाचा मुद्दा उपस्थित केला होता. यावेळी त्यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यावरून राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले आहे. याशिवाय दिशा सालियन प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आल्याचं चित्रही पहायला मिळालं. या पार्श्वभूमीवर भाजपाचे नेते नितेश राणेंनी आदित्य ठाकरे यांची नार्को टेस्ट करा, अशी मागणी केली आहे.
प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना आमदार नितेश राणे म्हणाले, “आदित्य ठाकरेंची नार्को टेस्ट करा आणि सुशातसिंग राजपूत व दिशा सालियान यांच्याबाबतचं सत्य लोकांना समजू द्या. दिशा सालियानची केस आजही मुंबई पोलिसांकडे आहे, सीबीआय़कडे नाही. सीबीआय केवळ सुशांतसिंग राजपूतच्याच केसचा तपास करत आहे. मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगेन, की दिशा सालियानची केस जी आज मुंबई पोलिसांकडे आहे, ती कृपा करून आपण पुन्हा सुरू करा त्याची परत चौकशी करा.
याचबरोबर “सगळेच लोक एका माणसाचं नाव का घेत आहेत? महाराष्ट्रात दुसरे नेते नाहीत? एकाच माणसाचं नाव घेताय, म्हणजे काहीना काहीतरी असेल. ३२ वर्षांच्या आमच्या कोवळ्या मित्राने एसआयटी समोर जाऊन बसावं आणि सत्य ते सांगावं.” असंही नितेश राणेंनी टीव्ही 9 शी बोलताना सांगितलं.
याशिवाय, “हुकुमशाही होती म्हणून तर दिशाला तेव्हा न्याय मिळाला नाही. आता लोकशाही आहे, आता आमच्या माता-भगिनींना न्याय मिळेल. हे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार करेल.” असंही यावेळी नितेश राणे म्हणाले.
दिशा प्रकरणावरुन शिंदे गट आणि भारतीय जनता पार्टीने शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरेंना घेरण्याचं प्रयत्न केला. दिशा सालियन प्रकरणावरून विविध प्रश्न उपस्थित करत चौकशीची मागणी शिंदे गट आणि भाजपाने केली होती. याप्रकरणावरून झालेल्या गोंधळामुळे पाचवेळा विधानसभा तहकूबही करण्यात आली. त्यानंतर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियन प्रकरणामध्ये एसआयटीच्या माध्यमातून चौकशी केली जाईल अशी घोषणा केली.
आदित्य ठाकरे काय म्हणाले? –
३२ वर्षांच्या तरुणाला खोके सरकार घाबरलं आहे. त्यामुळे बदनामीचे प्रयत्न होत आहे. घोटाळेबाज गद्दार मुख्यमंत्री ज्या प्रकरणात सापडले आहेत, त्यावरून आम्हाला विधानसभेत बोलू दिलं जात नाही. सत्ताधारी मंडळीतील १४ लोकांना बोलू दिलं जातं. राज्यपाल आणि घोटाळेबाज मुख्यमंत्र्यांना वाचवण्यासाठी हे प्रयत्न सुरु आहेत. एनआयटी घोटाळा विधानसभेत काढून दिला जात नाही, असा आरोप शिवसेना आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केला आहे.