अकोला: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधी सोहळ्यात उपस्थित राहिल्याप्रकरणी अकोला राष्ट्रवादी काँग्रेसचे महानगराध्यक्ष विजय देशमुख यांच्यावर बडतर्फीची कारवाई करण्यात आली. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी ही कारवाई केली.
राज्यात रविवारी मोठा राजकीय भूकंप झाला. त्याचे पडसाद आता राज्यभर उमटू लागले आहेत. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. या कार्यक्रमात त्यांच्या समर्थकांनी हजेरी लावली होती. त्या समर्थकांवर आता कारवाईचे सत्र सुरू झाले. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी एका पत्रान्वये अकोला महानगर जिल्हाध्यक्ष विजय देशमुख यांना बडतर्फ केले. विद्यमान सरकारमध्ये सामील होणाऱ्या उपमुख्यमंत्री व मंत्री पदाची शपथ घेतलेल्या पक्षाच्या आमदारांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिल्याने हे कृत्य पक्ष शिस्त तसेच पक्षाची ध्येयधोरणे याच्या विरोधी आहे.
हेही वाचा >>>एमपीएससी परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांची काळी यादी जाहीर, यापुढे परीक्षा…
ही कृती राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या ध्येय धोरणांशी विसंगत असल्याने २ जुलैपासून पक्षाच्या सदस्यत्वावरुन व अकोला महानगर जिल्हाध्यक्ष पदावरून तातडीने बडतर्फ करण्यात येत आहे, असे पत्रात नमूद आहे. यापुढे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नाव, चिन्ह याचा वापर करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देखील पत्रातून देण्यात आला आहे.