नागपूर : मुंबईला केंद्रशासित प्रदेश जाहीर करण्याची मागणी करणाऱ्या आमदाराला बरखास्त करा, अशी मागणी शिवसेनाचे (उद्धव ठाकरे गट) आमदार आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना दिली.
दोन दिवसांपासून महाराष्ट्र एकीकरण समितीद्वारे बेळगावच्या सीमावर्ती भागाला केंद्रशासित प्रदेश जाहीर करा, अशी मागणी सरकारकडे केली आहे. तर कर्नाटक राज्यातील काँग्रेसचे आमदार लक्ष्मण सौदी यांनी मुंबईलाही केंद्रशासित प्रदेश करा, अशी मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर बोलताना आदित्य ठाकरे म्हणाले, ‘काँग्रेस असो की भाजप कोणत्याही पक्षाच्या नेत्यांनी बेळगाव किंवा महाराष्ट्राचा अपमान केला असल्यास ते सहन केले जाणार नाही. मुंबईला केंद्रशासित करण्याची मागणी करणाऱ्या आमदाराला बरखास्त करायला हवे. मुंबई मिळवण्यासाठी मराठी माणसाने भरपूर संघर्ष केला आहे, तो विसरता येणार नाही.’ बेळगाव प्रश्नावर शिवसेनेच्या शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील म्हणाले,‘बेळगाव व मुंबई याची तुलना करणे चुकीचे आहे. मुंबईने कधीच बेळगावप्रमाणे कुठल्याच भाषिकावर अन्याय केला नाही. मुंबई ही महाराष्ट्राची आहे व राहणार आहे. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे. बेळगाव केंद्रशासित झालाच पाहिजे ही आमची मागणी आहे.’
आणखी वाचा-एकनाथ शिंदे म्हणाले, “संघाकडून निस्वार्थ भावनेने काम कसे करावे…”
कर्नाटक सरकारची दादागिरी सुरू : शंभुराज देसाई
मंत्री शंभूराज देसाई यांनी बेळगाव सीमा वादाच्या पार्श्वभूमीवर कर्नाटक सरकारवर कडाडून हल्ला चढवला. विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलाताना ते म्हणाले,‘कर्नाटक सरकारने सतत वादग्रस्त भागातील मराठी भाषिकांच्या अधिकारांना डावलले आहे. मागील सरकारच्या कार्यकाळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या प्रश्नावर उपाय शोधण्यासाठी समन्वय मंत्र्यांची नियुक्ती केली होती. मात्र, कर्नाटक सरकारने महाराष्ट्राच्या शिष्टमंडळाला बेळगावला भेट देण्यास मज्जाव करून हे प्रयत्न हाणून पाडले. कर्नाटक सरकारची ही दादागिरी अनेक वर्षांपासून चालू आहे.’