बुलढाणा : नावातच पूर असलेल्या संग्रामपूर तालुका सध्या कोसळधार पाऊस व रौद्र रूप धारण केलेल्या केदार नदीच्या पुराचा प्रत्ययकारी अनुभव घेत आहे. पुराचे पाणी तीन गावांत घुसल्याने हजारावर ग्रामस्थांनी सुरक्षित जागी स्थलांतर केले असून अनेकांनी छतावर आसरा घेतला आहे. तीन गावाचा अन्य गावांशी असलेला संपर्क तुटला आहे. बावनबीर- टूनकी रस्ता बंद झाला असतानाच शेतीचे अतोनात नुकसान झाले आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या संग्रामपूर तालुक्यातील कुरुंदा परिसरात ढगफुटी सदृष्य पावसामुळे हाहाकार उडाला आहे. दुथडी भरून वाहणाऱ्या केदार नदीचे पाणी थेट बावनबिर, टुनकी आणि सोनाळा गावात घुसले आहे. यापरिनामी जिवाच्या भीतीने हजारापेक्षा अधिक नागरिकांचे स्थलांतर करावे लागले आहे. पुरात गावातील अनेक प्राणी वाहून जात आहे. मातीच्या घरांची पडझड झाल्यामुळे संसारोपयोगी वस्तुंचे मोठे नुकसान झाले आहे. शेकडो नागरिकांनी गावातील पक्क्या घरांच्या छतांवर आसरा घेतला आहे. या ठिकाणी अद्याप पर्यंत प्रशासन पोहोचले नसल्याने संकटग्रस्त नागरिकांमध्ये संतप्त प्रतिक्रिया उमटली आहे.
हेही वाचा >>>विदर्भात सर्वत्र मुसळधार पाऊस; भंडारा, गोंदियात वीज कोसळून पाच जणांचा मृत्यू, २७ जखमी
काल रात्रीपासून धो-धो पाऊस कोसळत आहे. यामध्ये सातपुड्यात पाऊस जास्त होत असल्याने पहाटे पासून या भागातील नदी नाल्यांना पूर आलेला आहे. केदार नदीला मोठा पूर आला आहे. नदीचे पाणी बावनबिर, टुनकी आणि सोनाला या गावात शिरल्यामुळे हाहाकार उडाला आहे. दरम्यान शेगाव ते वरवट बकाल, संग्रामपूर ते जळगाव जामोद दरम्यानचा आणि बावनबिर, टुनकी आणि सोनाला या गावाचा तालुक्यांशी संपर्क तुटला आहे.