संजय मोहिते, लोकसत्ता

बुलढाणा : येथे आज आयोजित १४ वे जिल्हा साहित्य संमेलन निर्भीड राजकीय-सामाजिक अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे प्रदर्शन ठरले. संमेलनाच्या उदघाटक अभिनेत्री मुक्ता कदम (पुणे) यांनी सत्ताधाऱ्यांवर टीकास्त्र सोडल्याने साहित्य संमेलनाचे स्वरूपच बदलले. यामुळे एरवी औपचारिक व भाषणापुरते मर्यादित असणारे उदघाटपर सत्र परखड भाषणांनी वादळी ठरले.

स्थानिय जिजामाता महाविद्यालयाच्या परिसरात जिल्हा साहित्य संघाचे संमेलन आयोजित करण्यात आले. स्वागताध्यक्ष प्राचार्य उमेश कोठे, रवींद्र इंगळे चावरेकर, सदानंद देशमुख, उमेश कुमावत, विश्वनाथ माळी, सिद्धार्थ खरात, प्रकाश पोहरे, प्रशांत घुले, संदीप काळे, आदी विविध क्षेत्रातील मान्यवरांसह साहित्य रसिकांच्या साक्षीने पार पडलेले प्रथम सत्र अक्षरशः गाजले. संमेलनाच्या उदघाटक अभिनेत्री मुक्ता कदम व अध्यक्ष मराठा सेवा संघाचे संस्थापक पुरुषोत्तम खेडेकर यांच्या निर्भीड भाषणांनी उदघाटन सोहळा वादळी ठरला. मुक्ता कदम यांनी बुलढाण्याच्या लेखिका ताराबाई शिंदे यांच्या दीडशे वर्षांपूर्वीच्या ‘स्त्री पुरुष तुलना’ या पुस्तकाची वैशिष्ट्ये विशद करीत त्यातील क्रांतिकारी लिखाणाचा उहापोह केला.

आणखी वाचा-रविवार असतानाही आमदारी रद्द करण्याची घाई का?, सुनील केदार यांचे सदस्यत्व रद्द; नाना पटोलेंची भाजपावर टीका

यानंतर वर्तमानाचा वेध घेत, दीडशे वर्षानंतरही आज खऱ्या अर्थाने स्त्री व पुरुष आली का? असा अस्वस्थ करणारा सवाल त्यांनी उपस्थित केला. याचे उत्तर आजतरी ‘नाही’ हेच आहे अशी मनस्वी खंत त्यांनी बोलून दाखविली. समाजात आजही पुरुषी अहंकार, मक्तेदारी, मानसिकता, प्रभुत्व, वर्चस्व, कायम असल्याचे त्या म्हणाल्या. साहित्य हे फक्त मनोरंजनासाठी नाही हे ठासून सांगताना, जे काही अमानवीय आहे त्यावर साहित्यिकांनी लिखाण करणे काळाची गरज आहे. शोषित, वंचितांच्या व्यथा साहित्यात येणे अभिप्रेत व आवश्यक आहे. सामाजिक व साहित्य क्षेत्राचा धांडोळा घेतल्यावर मुक्ता कदम यांनी देशातील विदारक परिस्थिती वर हल्लाबोल केला. देशातील लोकशाही चोहोबाजुनी धोक्यात आली आहे, छुपी हुकूमशाही दाखल झाली, रुजण्याची नव्हे दृढ होण्याची चिन्हे आहे.विरोधी पक्षांच्या १४७ खासदारांचे निलंबन याचे प्रत्ययकारी उदाहरण आहे. त्यांच्या गैरहजेरीत सभागृहात विधेयके पारित होण्याचा सपाटा (सत्ताधार्यांनी) लावला आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याची गळचेपी होत आहे. मणिपूर मधील घटनाक्रम न विसरता येण्यासारखे आहे. कुस्तीपटू साक्षी मलिक चे दुर्देवी प्रकरण आहे. याचे किती जणांना वाईट वाटले, किती जण या सर्व घडामोडीवर व्यक्त झाले? असा करडा सवाल त्यांनी करताच संमेलनस्थळ अस्वस्थ झाल्याचे दिसून आले.

दीडशे लाख कोटींचे कर्ज

भारताच्या पहिल्या १३ पंतप्रधानांनी मिळून ५० लाख कोटी कर्ज घेतले. आताच्या पंत प्रधानांनी १५० लाख कोटींचे कर्ज घेतले आहे. मणिपूर जळते आहे, शिक्षणावरील खर्च ४.५० टक्क्यावरून ३ टक्यावर आल्याचे विदारक चित्र आहे. अश्या स्थितीत भारत महासत्ता होणार तरी कसा? असा सवाल त्यांनी केला. या ऐतिहासिक चुकांच्या विरोधात साहित्यिक व सुजाण नागरिकांनी बोलले पाहिजे अशी अपेक्षा करून याविरुद्ध व्यक्त होण्याचे आवाहन कदम यांनी उपस्थितांना केले. यापासून अलिप्त राहून चालणार नाही असा इशारा देऊन ‘मला काय त्याचे?’ ही मनोवृत्ती घातक असल्याचे त्या म्हणाल्या. राजकारणापासून आपण अलिप्त राहू शकत नाही असे सांगून आपल्याशी संबधित वीज, अन्न, शिक्षण सारख्या प्रत्येक घटकांचा राजकारणाशी संबंध आहे. राजकीय निर्णयावर अप्रत्यक्षपणे का होईना आपले जीवन अवलंबून आहे, असे समीकरण त्यांनी मांडले. त्यामुळे सजग नागरीकांची भूमिका वठविणे व ‘परिवर्तनात’ सहभागी होणे काळाची गरज असल्याचे त्यांनी समारोपात सांगितले.

आणखी वाचा-प्रेमसंबंध उघडकीस येताच बलात्काराची तक्रार, बहिणीच्या दिराविरुद्ध गुन्हा दाखल

खेडेकरांचे सामाजिक ‘बौद्धिक’!

अध्यक्षीय भाषणात पुरुषोत्तम खेडेकर यांनी सत्ताधाऱ्यावर अधूनमधून ताशेरे ओढत सामाजिक सुधारणावर जोर दिला. आपल्या (बहुजनांच्या) उष्ट्यावर अनेक जण मोठे झाले, पण आपण आहोत तिथेच आहोत ही विदारक बाब असल्याचे ते म्हणाले. जाधव घराणे विदर्भाचे तर भोसले घराणे मराठवाड्याचे. त्यांच्या पोटी जन्मलेले शिवबा पश्चिम महाराष्ट्रात हौसेमौजेसाठी गेले नाहीत.ते तेथील जनतेवरील अन्याय दूर करण्यासाठी गेले. त्यांनी तिथे प्रभुत्व, वर्चस्व निर्माण केलं. मात्र आज विदर्भाच्या शेंड्या पश्चिम महाराष्ट्राच्या हाती आहे, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. इंग्रज देश सोडून गेले तेंव्हा अमरावती जिल्हा सर्वाधिक शिक्षित जिल्हा होता तर पुणे हा ( सर्वाधिक) विधवांचा जिल्हा होता. आजचे चित्र याच्या विरुद्ध आहे. आज पुणे हे विध्येचे माहेरघर आहे तर अमरावतीच नव्हे तर विभागातील इतर जिल्हे शेतकरी विधवांचे जिल्हे म्हणून ओळखले जातात. शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून या प्रांताची ओळख आहे. यासाठी सत्ताधारी देखील जवाबदार असल्याचे खेडेकर म्हणाले.

महिलांच्या शिक्षणाचे प्रमाण वाढले पण महामानवाना अपेक्षित सामाजिक परिवर्तन झाले नाही, हे वास्तव आहे. महिला अवकाशात पोहोचल्या पण अगदी ‘पीएचडी’धारक महिलाही चंद्राचे दर्शन घेऊन उपवास सोडतात. सर्वाधिक व्रत वैकल्ये करतात, त्यांना पंचांग, अमावस्या-पौर्णिमा चे दिवस पाठ असतात. उच्च शिक्षित महिलाही मुलगा आणि मुलगी असा भेद करतात,याला काय म्हणावे? असा सवाल त्यांनी केला. त्यामुळे अब्राम्हणी साहित्यिकासह बहुजणांनी आपल्या घरातून आमूलाग्र सामाजिक परिवर्तन घडविले पाहिजे. मी, कुटुंब बदललो तर समाज परिवर्तन होईल याची खुणगाठ मनाशी बांधण्याचे आवाहन त्यांनी केले. याची मोठी जबाबदारी महिलांची असल्याचे सांगून त्यांनी आमूलाग्र परिवर्तन स्वीकारले तरच खऱ्या अर्थाने स्त्रीवाद निर्माण होईल, असा आशावाद त्यांनी बोलून दाखविला.

Story img Loader