अनिल कांबळे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर : सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी त्यांना मिळणाऱ्या बोनसमुळे आनंदात जात असली तरी त्याला पोलीस विभाग अपवाद आहे. करोना काळात जीव धोक्यात घालून कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणाऱ्या राज्यातील पोलिसांमध्ये पोलीस बोनस न दिल्यामुळे नाराजीचा सूर आहे. राज्यातील कायदा व सुव्यवस्था कायम ठेवण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना प्रसंगी १८ ते २० तास कर्तव्यावर हजर राहावे लागते. अनेकदा प्रसंगावधान व सामाजिक बांधीलकीची जाणीव ठेवून पोलीस कर्मचारी नागरिकांच्या मदतीला धावून जातात. सततचा बंदोबस्त, राजकीय बंदोबस्त, सण-उत्सवानिमित्त बंदोबस्तात पोलीस असतात. त्यांच्या कामाची वेळ ठरलेली नसते.  करोना काळात त्यांनी केलेल्या कामाचे सर्वत्र कौतुकही झाले. आपत्कालीन परिस्थितीत पोलीस कर्मचारी कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावा म्हणून कार्यरत होते. मात्र, राज्य शासनाने अद्याप त्यांना दिवाळी भेट म्हणून बोनस जाहीर केलेला नाही. पोलिसांना प्रोत्साहन म्हणून इतर विभागाच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे बोनस मिळायला हवा, अशी मागणी राज्यभरातील पोलीस कर्मचाऱ्यांनी केली आहे.

थेट मुख्यमंत्र्यांना पत्र

धुळे पोलीस प्रशिक्षण केंद्रात कार्यरत आर.आर. चव्हाण या पोलीस निरीक्षकाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून पोलिसांना एक महिन्याचे वेतन दिवाळी बोनस म्हणून देण्याची मागणी केली आहे. हे पत्र मुख्यमंत्री कार्यालय, गृहमंत्री कार्यालय, अर्थमंत्री कार्यालय आणि राज्याचे पोलीस महासंचालक कार्यालय अशा विविध कार्यालयांना पाठवण्यात आले आहे, हे विशेष.

समाजमाध्यमांवर खदखद

अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी दिवाळी बोनस मिळणार नसल्यामुळे समाजमाध्यमांवर खदखद व्यक्त केली. पोलीस महासंचालक आणि गृहमंत्र्यांनी दिवाळी बोनस देण्यासाठी सकारात्मकता दर्शवावी, असे संदेशही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर झळकत आहेत. अन्य शासकीय कर्मचाऱ्याच्या तुलनेत पोलिसांचे कामाचे तास जास्त असल्यामुळे नियमित बोनस हा हक्क असल्याचा दावाही केला जात आहे.

करोना काळात सार्वजनिक आरोग्य खाते आणि महापालिका कर्मचाऱ्यांप्रमाणेच पोलिसांनी २४ तास काम केले. अनेक पोलिसांना करोनामुळे प्राण गमवावे लागले. कोरोना योद्धा म्हणून पोलिसांना गौरव झाला. पण दिवाळी बोनस देण्याची वेळ आली, तेव्हा राज्य शासनाने सापत्न वागणूक दिली, ही खेदजनक बाब आहे.

– नीलेश नागोलकर, पोलीस मित्र न्याय-हक्क संघर्ष समिती

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Displeasure the police state as they will not get diwali bonus ysh
Show comments