लोकसत्ता टीम
गोंदिया: गेल्या आठवड्यात भंडारा जिल्ह्यात शिवसेना कार्यकारिणी बैठकीत आ. नरेंद्र भोंडेकर यांनी गोंदिया-भंडारा लोकसभा वर शिवसेनेने दावा केला होता यावरून बरीच खडाजंगी झाली होती. ती शमते नी शमते यात खासदार सुनील मेंढे यांनी उडी घेत स्थानिक शिवसेनेला हा अधिकार कुणी दिला तसेच असे निर्णय स्थानिक पातळीवर होत नसून पक्षातील वरिष्ठ पातळीवर होतात असे सुचवून आणि या लोकसभा मतदार संघात शिवसेनेचे अस्तित्व फक्त भंडारा विधानसभा पुरतीच असल्याचे वक्तव्य केले होते.
नेमके हेच वक्तव्य गोंदिया जिल्हा शिवसेना प्रमुख मुकेश शिवहरे यांना झोंबले व खासदार मेंढे यांच्या शिवसेनेच्या वक्तव्यावर मुकेश शिवहरे म्हणाले, आधी तुमच्या जागेची काळजी करा. पलटवार करीत ते म्हणाले की शिवसेनेचे अस्तित्व आणि ताकद पाहण्यापेक्षा खासदार सुनील मेंढे यांनी आपले पाच वर्षांचे संसदीय काम पाहिले पाहिजे, या ५ वर्षांत त्यांनी भाजपची ताकद या लोकसभा मतदार संघात किती वाढवली आहे हे पाहिली पाहिजे. त्यांना शिवसेनेचे अस्तित्व गणना करायची गरज नाही.
आगामी निवडणुकीत भाजपकडून तिकीट कसे मिळेल, याची काळजी त्यांना असावी. ही लोकसभा निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव भंडारा येथील शिवसैनिकांनी घेतला, तो त्यांचा हक्क आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वरच्या पातळीवर घेतलेले निर्णय सर्वांना मान्य असतील. खासदार मेंढे यांना पक्षाने डावलण्याचा प्रयत्न केला नाही तर पूरे. असे म्हणत त्यांनी खासदार सुनिल मेंढे वर पलटवार केला.