अमरावती : शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्‍या उपस्थितीत दर्यापूर येथे मेळावा आयोजित करून माजी आमदार अभिजीत अडसूळ यांनी मोर्चेबांधणी सुरू केली असताना भाजपच्‍या माजी खासदार नवनीत राणा यांनी दर्यापुरात बाहेरचे पार्सल चालणार नाही, असा इशारा देत, अडसूळ यांच्‍या उमेदवारीला विरोध दर्शविल्‍याने महायुतीतील दोन नेत्‍यांमध्‍ये जुंपल्‍याचे चित्र सोमवारी पहायला मिळाले.

दर्यापूर मतदार संघात बाहेरचे पार्सल खपवून घेतले जाणार नाही. अमरावती जिल्‍ह्यातीलच कार्यकर्त्‍याला भाजप उमेदवारी देईल आणि स्थानिकच उमेदवार निवडून येईल, असा दावा नवनीत रवी राणा यांनी सोमवारी कार्यकर्त्‍यांच्‍या बैठकीत बोलताना दिला. कोणताही आमदार कुठल्याही पक्षात गेला तरी मेळघाटात फक्त भाजपचाच उमेदवार राहणार, मेळघाट किंवा दर्यापूर, अचलपूर, तिवसा या मतदारसंघांमध्‍ये केवळ कमळ चिन्हावरील उमेदवार राहील आणि तोच निवडून येईल, असा विश्‍वास नवनी राणा यांनी व्‍यक्‍त केला.

हेही वाचा >>>बनावट नोटा बाळगणे गुन्हा नाही, उच्च न्यायालयाकडून आरोपीला जामीन…

दुसरीकडे, दर्यापूर येथे आयोजित शिवसेना शिंदे गटाच्‍या मेळाव्‍यात बोलताना अभिजीत अडसूळ यांनी नवनीत राणा  यांच्‍यावर टीका केली. ते म्‍हणाले, गृहमंत्री अमित शहा यांच्‍या सांगण्‍यावरून अमरावी लोकसभेची जागा भाजपला सोडण्‍यात आली आणि आपला घात झाला. शिवसेनेच्‍या हातून ही जागा गेली. नवनीत राणा यांना लोकांचा विरोध आहे, त्‍या निवडून येणार नाहीत, हे आम्‍ही सुरूवातीपासून सांगत होतो. दर्यापूरची जागा ही शिवसेनेची हक्‍काची जागा आहे. तरी देखील काही लोक इथे अडचणी निर्माण करीत आहेत. एकदा आम्‍ही गप्‍प बसलो. आता गप्‍प बसणार नाही, असा इशारा अडसूळ यांनी राणा दाम्‍पत्‍याला दिला.

हेही वाचा >>>“ही तर जुनी बातमी, त्यात नवीन काय?” फडणवीस कोणाबाबत बोलले?

नवनीत राणा यांनी दर्यापूरच्‍या जागेवर दावा केला आहे. अमरावती जिल्‍ह्यातीलच उमेदवार आम्‍हाला दर्यापूरमध्‍ये पाहिजे. बाहेरचे पार्सल चालणार नाही, असे सांगून नवनीत राणा यांनी अप्रत्‍यक्षपणे अभिजीत अडसूळ यांच्‍यावर टीका केली. दर्यापुरातून भाजपचा उमेदवार निवडणूक लढणार असल्‍याचे त्‍यांनी स्‍पष्‍ट केले. महायुतीत दर्यापूर मतदारसंघ भाजपला सुटावा, यासाठी आम्‍ही प्रयत्‍न करीत असल्‍याचे त्‍या म्‍हणाल्‍या. त्‍यामुळे आता भाजप आणि शिंदे गटात दर्यापूरच्‍या जागेवरून संघर्ष निर्माण होण्‍याची शक्‍यता आहे. लोकसभा निवडणुकीच्‍या वेळी देखील अडसूळ यांनी नवनीत राणा यांच्‍या उमेदवारीला विरोध केला होता. पण, आता पुन्‍हा एकदा राणा आणि अडसूळ यांच्‍यात वाद उफाळून आला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी दर्यापूरमध्‍ये बोलताना महायुतीच्‍या उमेदवाराला निवडून द्या, असे आवाहन केले, त्‍याचवेळी नवनीत राणा यांनी अडसूळ यांच्‍या उमेदवारीला विरोध दर्शविला आहे.

Story img Loader