अकोला : जुने शहर येथील हरिहरपेठ भागात किरकोळ कारणावरून दोन गटात मोठा वाद झाल्याची घटना सोमवारी सायंकाळी घडली. या वादातून तुफान दगडफेक करण्यात आली. एक ऑटो रिक्षा व तीन दुचाकी वाहनांची जाळपोळ करण्यात आली आहे. पोलिसांनी घटनास्थळावर चोख बंदोबस्त तैनात केला असून संचारबंदी सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे. शहरात तणावपूर्ण शांतता आहे. कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

प्राप्त माहितीनुसार, जुने शहरातील हरिहरपेठ भागात ऑटो रिक्षाचा एका दुचाकीला धक्का लागला. या कारणावरून दोन्ही चालकांमध्ये बाचाबाची झाली. त्याचे मोठ्या वादात पर्यवसान झाले. या वादावरून गाडगे नगर व हमजा प्लॉट येथील दोन मोठे गट आमने-सामने आले. वाद आणखी वाढल्याने दोन्ही बाजूने तुफान दगडफेक करण्यात आली. यामुळे घटनास्थळी दगडचा खच पडला आहे. त्यानंतर संतप्त जमावाने एका ऑटो रिक्षा व तीन दुचाकीला आग लावली. या आगीमध्ये चारही वाहने जळून खाक झाली. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. जमावाला पांगवण्यासाठी सौम्य लाठीमार करण्यात आला. त्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आली. घटनास्थळ व परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. जुने शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेऊ नये, शहरात शांतता आहे, असे आवाहन अकोला पोलिसांनी केले आहे.

हेही वाचा >>>रामझुला हिट अँड रन प्रकरण: अखेर रितिका मालूला पोलीस कोठडी…

जुने शहर अत्यंत संवेदनशील

अकोल्यातील जुने शहर हा भाग अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखला जातो. यापूर्वी समाजमाध्यमावरील एका आक्षेपार्ह पोस्टच्या कारणावरून १३ मे २०२३ रोजी शहरात दंगल उसळली होती. त्यात एकाचा बळी गेला, तर १० जण जखमी झाले होते. या प्रकरणी जुने शहर व रामदास पेठ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करून १५० हून अधिक आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर ही जुने शहर भागात अनेक वेळा तणावाची परिस्थिती निर्माण झाली. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. आज घडलेल्या वादावरून परिसरात शांतता ठेवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. आमदार रणधीर सावरकर यांनी घटनास्थळ गाठून परिस्थितीची संपूर्ण माहिती घेतली. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना देखील घटनेबाबत अवगत करण्यात आले आहे.