अकोला : जिल्ह्याच्या बाळापूर तालुक्यातील हातरुण गावामध्ये एकाच समाजाच्या दोन गटात मोठा वाद झाल्याची घटना सोमवारी दुपारी घडली. या वादातून एका चारचाकी वाहनाची जाळपोळ करून मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. लाठीकाठीने परस्पर हल्ला देखील करून हाणामारी झाली. या घटनेत सहा जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.घटनेची माहिती मिळताच पोलिसांचा मोठा फौजफाटा गावात तैनात करण्यात आला. गावात तणावपूर्ण शांतता असून परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिसांनी आरोपीची धरपकड सुरू केली. बाळापूर तालुक्यातील हातरुण गावात एकाच समाजाच्या दोन गटात आज किरकोळ कारणावरून मोठा वाद झाला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गावातील अवैध धंद्यावर पोलिसांनी कारवाई केली. गावातीलच खबऱ्याने दिलेल्या माहितीवरून ही कारवाई झाल्याचा मनात राग धरून एकाच समाजाचे दोन गट आपसात भिडले. वाद वाढत जाऊन हाणामारी केली. या वादातून एक चारचाकी गाडी जाळून टाकण्यात आली.दोन्ही गटाकडून परस्परांवर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली. लाठीकाठीने हल्ला देखील करण्यात आला. या घटनेमध्ये सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना तत्काळ उपचारार्थ अकोल्यातील सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमीपैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती वैद्यकीय सूत्रांनी दिली.हातरुणमधील दोन गटातील वादाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेतली. परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी गावाला भेट देऊन परिस्थितीची माहिती घेतली. दोन्ही गटातील लोकांची धरपकड पोलिसांनी सुरू केली. काही जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून इतरांचा शोध घेतला जात आहे.

या प्रकरणी दोन्ही गटातील आरोपींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. गावात मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त लावण्यात आला. गावात तणावपूर्ण शांतता असून अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

गावात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न

बाळापूर तालुक्यातील हातरुण जिल्ह्यातील गाव अत्यंत संवेदनशील म्हणून ओळखले जाते. गेल्या काही दिवसांपासून गावात अशांतता पसरवण्याचा प्रयत्न होत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. काही दिवसांपूर्वीच गावात आलेल्या किरकोळ विक्रेत्यांना मुले चोरण्यासाठी आल्याची अफवा पसरवून त्यांना पकडून ठेवण्यात आले होते. त्यानंतर आज हातरुण गावामध्ये दोन गटात मोठा वाद झाला. हाणामारी, दगडफेक व जाळपोळीमुळे गावातील शांतता भंग झाली आहे. पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.