नागपूर : रक्तविहीन धम्मक्रांती घडवणारी दीक्षाभूमी, सर्वधर्म समभावाचे प्रतीक असणारा ताजुद्दीनबाबांचा दर्गा, कट्टर हिंदुत्ववादी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय अशा विविध विचारधारांचा एकत्र संगम असलेल्या नागपूरचा आजवरचा इतिहास हा सामाजिक सद्भाव जपणारा राहिला. मात्र सोमवारी रात्री उसळलेल्या दंगलीने या सद्भावालाच तडा दिला, अशी भावना सर्वसामान्य नागपूरकरांनी दंगलीनंतर व्यक्त केली.
नागपुरात सर्वच धर्माचे लोक गुण्यागोविंदाने नांदतात. देश-विदेशात घडलेल्या विद्वेष निर्माण करणाऱ्या कोणत्याही घटनांचे पडसाद नागपुरात उमटल्याचे उदाहरण नाही. संपूर्ण देश बाबरी मशिदीच्या आंदोलनात जळत असताना नागपुरात मात्र जातीय संघर्ष उद्भवला नाही. त्यावेळी पोलिसांनी गोळीबार केला, पण त्याला जातीय किनार नव्हती. बाराही महिने अनेक हिंदू बांधव मोमिनपुऱ्यात विविध पदार्थांचा आस्वाद घेण्यासाठी जातात. नागपुरातील ताजुद्दीन बाबांचा दर्गा, दरवर्षी तेथे भरणारा ऊर्स हा सर्वधर्मसमभावाचे प्रतीक मानला जातो. दरवर्षी दसऱ्याला धम्मचक्र प्रवर्तन दिनाला देशभरातून लाखो बौद्ध बांधव नागपुरात येतात. गणेशोत्सवात, श्रीराम शोभायात्रेत मुस्लिमांचा सहभाग असतो. ही नागपूरची खरी ओळख. असे असताना दंगल उसळणे शक्य नाही. विद्वेष निर्माण करणाऱ्या घटनांमुळे हा प्रकार घडला असावा. परंतु, अशा विद्वेषामुळे सामाजिक सद्भावाचे जे नुकसान होते ते कधीही भरून न निघणारे असते, याकडेही अनेक नागपूरकरांनी आपल्या प्रतिक्रियेतून लक्ष वेधले.
मध्य नागपूर संवेदनशील
हिंदुत्ववादी संघटनांकडून अलीकडे करण्यात येणाऱ्या आंदोलनाच्या वेळी मध्य नागपुरातील अल्पसंख्याकबहुल वस्त्यांना लक्ष्य केले जात असल्याचे आढळून आले. औरंगजेबाची कबर तोडण्यासाठीचे आंदोलन प्रतीकात्मक असताना विशिष्ट धर्मीयांच्या भावना दुखावल्याने हिंसाचार उफाळल्याचे स्थानिक नागरिक सांगतात.
मोमिनपुऱ्यात शुकशुकाट
एरवी रात्री उशिरापर्यंत सुरू राहणाऱ्या मुस्लीमबहुल मोमिनपुऱ्याला व तेथील बाजारपेठेला दंगलीचा मोठा फटका बसला. सध्या रमजानचा महिना सुरू आहे. या काळात रोज कोट्यवधी रुपयांची उलाढाल या बाजारपेठेत होते. अनेक छोटे व्यावसायिक वर्षभराचा व्यवसाय याच काळात करतात. परंतु, पोलिसांनी या भागाकडे जाणारे रस्ते बंद केले. त्यामुळे बाजारपेठ ओस पडलेली दिसली. अनेक छोट्या व्यावसायिकांचा रोजगार बुडाला, अशी प्रतिक्रिया या भागातील नागरिकांनी व्यक्त केली.
तुकडोजी महाराजांची आठवण
१९६७ मध्ये नागपुरात दंगलसदृश्य स्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज रुग्णशय्येवर होते. त्यावेळी त्यांनी नागपूरमधील सर्वधर्मगुरूंना गुरुकुंज आश्रम मोझरी येथे निमंत्रित करून सामाजिक ऐक्य पुनर्स्थापित करण्याचे आवाहन केले होते, अशी आठवण गुरुदेव सेवा मंडळाचे ज्ञानेश्वर रक्षक यांनी सांगितली.
“नागपुरात ज्या भागात दंगल झाली तेथील वस्त्यांमध्ये सर्वधर्मीय संस्कृती जपली जाते. हिंसाचाराच्या घटनेमुळे तेथील ऐक्याला बाधा निर्माण झाली. त्यामुळे सर्वधर्मगुरूंनी या वस्त्यांमध्ये शांती मार्च काढावा व लोकांना शांततेचे आवाहन करावे ”- ज्ञानेश्वर रक्षक, प्रवर्तक, श्री गुरुदेव युवा मंच.
“ शहरातील सामाजिक सद्भाव कायम राहण्यासाठी सर्व नागपूरकरांनी प्रयत्न करावे. कोणीही कायदा हाती घेऊ नये, प्रत्येकाने सर्वांशी सहिष्णुतेने वागावे. त्यातून पुन्हा सद्भावना निर्माण होण्यास मदत होईल.”- मौलाना इलियास खान, अध्यक्ष, जमाते ए इस्लामी हिंद, महाराष्ट्र.