अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात होणारे कार्यक्रम चार घटक संस्थांना विश्वासात घेऊन महामंडळ आणि आयोजक संस्थांच्यामार्फत कार्यक्रम ठरवले जातात. साहित्य संमेलन हा मराठी भाषेचा उत्सव असल्यामुळे त्यात प्रकाशकांसह साहित्यिक, कवी, राजकीय नेते आदी सहभागी होत असतात. कुठल्याही विषयावरून विसंवाद होऊ नये. संवादातून प्रश्न सुटू शकत असल्यामुळे तसाच प्रयत्न यावेळी राहणार असल्याचे मत मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्ष डॉ. माधवी वैद्य यांनी व्यक्त केले.
घुमानमध्ये झालेल्या साहित्य संमेलनात प्रकाशकावरून वाद झाल्यानंतर त्यावर चर्चा झाली असली तरी यावेळी तसे होणार नाही याची काळजी घेण्यात येणार आहे. प्रकाशकांचे दोन सदस्य समितीमध्ये असल्यामुळे त्यांना विश्वासात घेऊन गं्रथ प्रदर्शन आणि विक्रीबाबत त्यांना जागा उपलब्ध करून देणार आहे. कुठल्याही विषयावर वाद निर्माण करण्यापेक्षा महामंडळाची प्रतिनिधी म्हणून माझ्याशी संपर्क साधावा. राजकीय नेत्यांना साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर बसवण्याचा वाद निर्माण केला जातो, मात्र त्यांना आमंत्रित करणे हे महामंडळ आणि आयोजक संस्थेचे कर्तव्य आहे. राजकीय नेते साहित्यिक नसतात, असे नाही. राजकीय नेत्यांनी मात्र अशा व्यासपीठावर साहित्यिक म्हणून सहभागी झाले पाहिजे. राज्याचे अनुदान घेतो त्यामुळे मुख्यमंत्री, सांस्कृतिक मंत्र्यांना आमंत्रित करणार आहोत. या संमेलनात असहिष्णुतेचे प्रश्न सहिष्णुतेने सोडवणार आहे. मराठी वाङ्मय पुरस्काराचे सामाजिक आणि सांस्कृतिक स्थान या विषयावर एक परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे.
दाभोळकर, पानसरे आणि कलबुर्गी यांची हत्या होणे हे भीषण वास्तव आहे आणि त्याचा निषेध केलाच पाहिजे. पुरोगामी असलेल्या देशात निषेधार्ह आहे. माणसे संपवून विचार संपणार नाही. प्रत्येकाने आपापल्या पद्धतीने त्याचा निषेध केला असून तो नोंदवला गेला पाहिजे. निषेधाचे मार्ग वेगवेगळे असले तरी स्वीकारले पाहिजे, असेही डॉ. वैद्य म्हणाल्या.
पिंपरी चिचवडमध्ये होणाऱ्या या संमेलनात १० ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त मान्यवरांच्या मुलाखती होणार असून त्यापैकी सहा उपस्थित राहणार आहेत. साहित्य संमेलनातील आजपर्यंतचे संमेलनायक्ष आणि त्याचा परिचय असलेला स्मरण ग्रंथ या संमेलनात प्रकाशित करण्यात येणार आहे. अनेक माजी अध्यक्ष या संमेलनाला उपस्थित राहणार आहे. यावेळी प्रथमच संमेलनाध्यक्षाची त्यांच्या साहित्य आणि कार्यकर्तृत्वावर मुलाखत घेतली जाणार आहे. १३ परिसंवाद, ३ कविसंमेलन, बहुभाषिक कविसंमेलन, कथाकथन, चला खेळूया हा बाल आनंद मेळावा, तरुणाईचा चेतन भगत आणि सुधा मूर्ती यांच्याशी संवाद, लेखक तुमच्या भेटीला, कवी कट्टा आदी कार्यक्रम या संमेलनात होणार आहे. कार्यक्रमांमध्ये सर्व जिल्ह्य़ातील साहित्यिक, कवीचा सहभाग राहील, असा प्रयत्न करण्यात आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग या संमेलनात करण्यात येणार आहे. अ‍ॅप तयार करण्यात आले असून ते डाऊनलोड करता येईल. ज्यांना या संमेलनात सहभागी व्हायचे आहे त्यांनी २ हजार रुपये शुल्क भरून सहभागी व्हावे. त्यात भोजन आणि निवास व्यवस्था करण्यात येणार असल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले. यावेळी गिरीश गांधी, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, सुनील महाजन उपस्थित होते.

Story img Loader