भंडारा: “भंडारा जिल्हा परिषद उपाध्यक्ष हे पद वाचविण्यासाठी भाजपला शरण जाणार? ” असे वृत्त १५ दिवसांपूर्वी लोकसत्ताने प्रकाशित केले होते. या वृत्तानंतर बीआरएस आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये चर्चेला उधाण आले होते. मात्र आता या चर्चांना पूर्णविराम मिळाला असून आज अखेर जि. प. उपाध्यक्ष संदीप ताले यांनी भाजप पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत दोन जि. प. सदस्यही भाजपमध्ये गेले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

भंडारा जिल्ह्यात तुमसर तालुक्यातील बीआरएस नेते तथा विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष चरण वाघमारे यांचे खंदे समर्थक समजले जाणारे भंडारा जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती संदीप ताले यांच्यासह जिल्हा परिषद सदस्य उमेश पाटील व जिल्हा परिषद सदस्य ध्रुपता मेहर यांनी विदर्भ संघटन मंत्री उपेंद्र कोठेकर यांच्या अध्यक्षतेखाली आज नागपूर येथे भाजपामध्ये प्रवेश केला. जिल्हा परिषद निवडणुकीनंतर काँग्रेसची वाट धरू पाहणाऱ्या या दोन सदस्यांना योग्य मार्ग दाखवण्यात यश आले असल्याचे डॉ. परिणय फुके यांनी यांनी त्यांच्या फेसबुकवर लिहिले आहे. यावेळी परिणय फुके, खासदार सुनिल मेंढे, गटनेते जिल्हा परिषद भंडारा विनोद बांते व पक्षाचे वरीष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा… गडचिरोली : देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्ग भूसंपादनात घोळ! ओलिताखालील जमीन कोरडवाहू दाखविल्याने आर्थिक झळ

मागील काही दिवसांपासून ते भाजपला शरण जाणार असल्याच्या चर्चाना उधाण आले होते. ताले यांच्यावर अपात्रतेची टांगती तलवार असल्याने त्यांचे उपाध्यक्ष पद धोक्यात आले होते. स्वतःचे पद वाचविण्यासाठी अखेर संदीप टाले ही शरणागती पत्करण्यास तयार झाल्याचेही बोलले जात होते. मात्र या चर्चांना आज विराम मिळाला आहे. असे असले तरी माजी आ. चरण वाघमारे यांचे अत्यंत निकटवर्ती समजले जाणारे टाले यांनी चरण वाघमारे यांची साथ सोडून भाजपला शरण जाणे अनेकांच्या पचनी पडलेले नाही. दरम्यान संदीप टाले यांच्यावरील अपात्रतेचा खटला मागे घेणार अशी शाश्वती भाजप कडून देण्यात येणार असल्याची खात्रीजमा माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. त्यामुळे अखेर धोक्यात आलेले उपाध्यक्ष पद वाचविण्यासाठी संदीप टाले भाजपला पुन्हा शरण गेले आहेत.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dist w vice president sandeep tale has finally joined bjp ksn 82 dvr