लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

चंद्रपूर: राज्यातील लाखो निराधारांना राज्य सरकारच्या संजय गांधी निराधार योजनेचा आधार आहे. पण गेल्या काही महिन्यांपासून या योजनेची रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. त्यामुळे हातावर पोट असलेले आणि या योजनेच्या पेन्शनमधून उदरनिर्वाह चालविणारे लाखो लाभार्थी प्रतीक्षेत आहेत. आपण अतिशय संवेदनशील मुख्यमंत्री असल्यामुळे तळागाळातील लोकांच्या वेदना आपण जाणता. त्यामुळे संजय गांधी निराधार योजनेची रक्कम तातडीने वितरित करण्याचे निर्देश देऊन निराधारांना दिलासा द्यावा, अशी भावनिक साद राज्याचे वने व सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्राद्वारे घातली आहे.

‘राज्यातील निराधार, वृद्ध, अंध, अपंग, शारीरिक, मानसिक आजाराने ग्रस्त, विधवा, घटस्फोटीत महिलांना अर्थसहाय्य देण्याच्या मूळ हेतूने १९८० पासून संजय गांधी निराधार योजना सुरू आहे. महाराष्ट्रात या योजनेची मासिक रक्कम गेल्या काही महिन्यांपासून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा झालेली नाही. यामध्ये विशेषत्वाने ग्रामीण भागातील लाभार्थी आहेत. त्यांचा उदरनिर्वाह केवळ संजय गांधी निराधार योजनेच्या आधारावर आहे. अशा लाभार्थ्यांवर उपासमारीचे संकट येऊ नये, यासाठी आपण लक्ष्य द्याल असा मला पूर्ण विश्वास आहे,’ असेही मुनगंटीवार यांनी पत्रात नमूद केले आहे.

आणखी वाचा-वाशिम: म्हशीने सोन्याची पोथ खाल्ली अन् एकच धांदल उडाली, नंतर मात्र…

उत्सवांमध्ये आर्थिक चणचण

‘राज्यात दहा लाखांपेक्षा अधिक लोक या योजनेचे लाभार्थी आहेत. सध्या सण-उत्सव प्रारंभ झाले आहेत. अशात सर्वत्र उत्साह असताना या आर्थिकदृष्ट्या दुर्बल व्यक्तीच्या वाट्याला मात्र प्रतीक्षा येत असेल तर लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला नक्कीच तात्काळ मार्ग काढणे क्रमप्राप्त आहे. या महत्त्वाच्या विषयाकडे आपण लक्ष देऊन, संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने तात्काळ निधी वितरित करण्याचे निर्देश द्यावे,’ अशी मागणी मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Distribute funds of sanjay gandhi niradhar yojana immediately sudhir mungantiwars emotional message to cm eknath shinde rsj 74 mrj
Show comments