यवतमाळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आज सोमवारी जगभर उत्साहात साजरी होत आहे. त्या निमित्त सर्वत्र रॅली, अभिवादन कार्यक्रम सुरू असताना यवतमाळ येथील तरुणांचा एक समूह ‘ एक हात मदतीचा, बाबासाहेबांच्या विचारांचा ‘ असा जयघोष करीत गरजू विद्यार्थ्यांना पेन, वही आदी शैक्षणिक साहित्याचे वाटप करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत आहे. समाजमाध्यमांचा सकारात्मक वापर करून समाजविधायक कार्य करणाऱ्या या ध्येयवेड्या तरुणांचा समूह आता समाजात चर्चेचा व आदराचाही विषय ठरतो आहे. विशेषतः या समूहाने गेल्या चार वर्षापासून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती (१४ एप्रिल) व  महापरीनिर्वाण दिन (६ डिसेंबर) या दोन्ही विशेष दिवशी हाती घेतलेला ‘एक हात मदतीचा, बाबासाहेबांच्या विचारांचा-एक वही-एक पेन’, हा उपक्रम समाजाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे धडे कृतीतून देत आहे. या समूहातील तरुणांनी आतापर्यत दोन हजारांवर विद्यार्थ्याना या उपक्रमाच्या माध्यमातून शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आले.  गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारप्रणाली ही अनुसरण्यासह कृतीत उतरविण्याची गरज आहे. ‘अत्त दीप भवः’ हा भगवान बुद्धांचा संदेश आणि शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा, हा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलेला यशाचा मार्ग, वास्तवात उतरवण्यासाठी हे तरुण धडपडत आहेत.

आजही समाजातील मोठा वर्ग विपन्नावस्थेत जगतो. त्याला शिक्षण घेताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. ही बाब हेरून यवतमाळ शहरातील तरुणांनी अभावात शिकणाऱ्या हातात वही-पेन देण्यास सुरुवात केली. त्यासाठी समाजातील नागरिकांना गरजू विद्यार्थ्यांना देण्यासाठी वही आणि पेन दान द्यावे, असे आवाहन करण्यात आले. १४ एप्रिल २०२१  बसस्थानक चौकात डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला सर्वप्रथम हे अभियान राबवण्यात आले. लोकसहभागातून जमा झालेले वही आणि पेन, गरजवंत विद्यार्थ्यांसह दुष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या मुलांना देण्यात आले. या अभियानाला लोकांनी भरभरून प्रतिसाद दिला. तेव्हापासून ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व महापरीनिर्वाण दिनानिमित्त हा उपक्रम सातत्याने सुरू आहे. उपक्रमाच्या माध्यमातून आतापर्यंत दोन हजारांवर विद्यार्थ्याना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले आहे. यंदाही हा उपक्रम राबवला जात आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी विद्यार्थ्यांना शिका, संघटित व्हा, संघर्ष करा हा संदेश दिला. त्यानुसार आज मोठ्या प्रमाणात तळागाळातील लोक शिक्षित झाले. मात्र, दुर्गम भागातील अनेक मुलां-मुलींना, तरुण-तरुणींना परिस्थितीअभावी शिक्षण घेता येत नाही. गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात टिकवून ठेवण्यासाठी या उपक्रमामार्फत प्रयत्न सुरू आहेत.  बाबासाहेबांची प्रेरणा घेऊन नागरिकांनी या उपक्रमासाठी सहकार्य करून साहित्य द्यावे, असा प्रयत्न हा उपक्रम चालविणारे तरुण करतात.  देशात शिक्षणाची परिस्थिती वाईट आहे. मागील वर्षी वाटप करण्यात आलेल्या शैक्षणिक साहित्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना शाळेत जिद्दीने जाण्याची, अभ्यासाची प्रेरणा मिळाली. आता अनेक शाळा या तरुणांना स्वतःच संपर्क करून, गरजू विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याची मागणी नोंदवितात. मात्र पर्याप्त साहित्य उपलब्ध नसल्याने मदतीसाठी मर्यादा येत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर  यांनी आपले संपूर्ण आयुष्य शिक्षणासाठी खर्ची घातले. त्यांच्या या समाजाभिमुख चळवळीची जाणीव ठेवून गरीब विद्यार्थी घडवण्याचा उद्देश या अभियानातून साकारला जात असल्याचे या अभियानाचे एक सदस्य ॲड. राहुल पाटील म्हणाले.