वर्धा : शासनाच्या उद्योग व कामगार खात्यातर्फे नोंदणी असलेल्या इमारत बांधकाम कल्याणकारी मंडळाच्या कामगारांना किचन सेट वाटप करण्याची योजना आहे. हे कामगार बांधकाम सूरू असलेल्या ठिकाणीच राहुटी टाकतात. तिथेच स्वयंपाक करतात. त्यासाठी अडचण येऊ नये म्हणून शासन घरगुती भांडी पुरवीते. हे असे वाटप सूरू झाल्याचे माहीत होताच एकच झुंबड उडाली.
देवळी तालुक्यात तर वर्धा यवतमाळ मार्गालगतच सोमवारपासून वाटप सूरू झाले. अनेक कामगार आणि त्यांचे कुटुंब आल्याने सकाळपासून झुंबड उडाली आहे. त्यांच्या दुचाकी रस्त्याच्या कडेलाच उभ्या असल्याने अपघाताची भीती व्यक्त होते. या महामार्गावर भरधाव वाहतूक सूरू असते. जिल्ह्यातील कारंजा, आष्टी, समुद्रपूर अश्या शंभर किलोमीटर दुरवरून कामगार पोहोचत आहे. परिणामी मोठी रांग लागली असून रोज ही गर्दी वाढत जाणार. या ठिकाणी कसलेच नियोजन नसल्याचा आरोप या कामगार संघटनेचे नेते तसेच माकप पुढारी यशवंत झाडे हे करतात.
कामगारांना उन्हात उभे रहावे लागते. पिण्याचे पाणी नाही. पार्किंग नाही. नोंदी करण्याची घाई अश्या अनेक अडचणी आहेत. जिल्हा कामगार अधिकाऱ्यांनी या ठिकाणी भेट देऊन उपाशी राहून दिवसभर तिष्ठत बसलेल्या कामगारांना दिलासा द्यावा, असे मत झाडे व्यक्त करतात. हे टाळण्यासाठी असे वाटप केंद्र अन्य सातही तालुका पातळीवर सूरू करण्याची मागणी पुढे आली आहे. संबंधित कंत्राटदाराने एखादे सभागृह भाड्याने घेऊन तिथे वाटप केले पाहिजे. या कामगारांना दुपारचे जेवन मिळावे. महिला कामगार उघड्यावर नैसर्गिक विधी आटोपतात. हे अत्यंत लज्जास्पद असल्याने याकडे शासन दुर्लक्ष करू शकत नाही. म्हणून वाटप गावाच्या दूर न ठेवता नागरी वस्तीलगत सर्व सोयी असलेल्या ठिकाणी ठेवण्याची मागणी होते.
किचन सेट
४ ताट, ८ वाट्या, ४ पेले तसेच तीन पातेले झाकणसह, दोन मोठे चम्मच, पाण्याचा जार, मसाला डब्बा, वेगवेगळ्या आकारातील तीन डब्बे, परात, कढई, पाच लिटरचा कुकर, स्टील टाकी अश्या एकूण तीस भांड्यांचा संच.