भंडारा : गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त गोरगरिबांना रास्त दरात ‘आनंदाचा शिधा’ देण्याची योजना शासनाच्यावतीने राबवण्यात येत आहे. मात्र, मोहाडी तालुक्यातील नेरी गावात शासकीय रेशन दुकानातून चक्क बुरशीजन्य डाळ (आनंदाचा शिधा किट) वाटप करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. मोहाडीचे तहसीलदार दीपक करंडे यांच्याकडे या प्रकारची तक्रार करताच त्यांनी रेशन दुकानदाराला बुरशीयुक्त डाळ परत घेण्याचे आदेश दिले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

जिल्ह्यातील शिधापत्रिकाधारकांना १०० रुपयांत ‘आनंदाचा शिधा’ दिला जात आहे. १०० रुपयांत प्रती एक किलो चना डाळ, रवा, साखर, तेल अशी ‘किट’ वाटप केली जात आहे. मोहाडी तालुक्यातील नेरी येथील रेशन दुकानदाराकडून ५० हून अधिक शिधापत्रिकाधारकांना शुक्रवारी आनंदाचा शिधा किटचे वाटप करण्यात आले. लाभार्थ्यांनी किट उघडली असता चना डाळीच्या पाकिटातून दुर्गंधी येऊ लागली. किटमध्ये बुरशी लागलेली, निकृष्ट दर्जाची डाळ होती. आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक असलेल्या या डाळीचे छायाचित्र व्हॉट्सॲपद्वारे तहसीलदारांना पाठवण्यात आले. त्यांच्या आदेशाने अखेर ती डाळ दुकानदाराला परत करण्यात आली.

हेही वाचा – व्याघ्र संवर्धनात राज्याची दर्जेदार कामगिरी; देशभरात ३,१६७ वाघांची नोंद, पंतप्रधानांच्या हस्ते अहवाल जाहीर

गरिबांची थट्टा करून त्यांच्या आरोग्याशी खेळ करण्याचे काम हे सरकार करीत असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख दीपक गजभिये यांनी केला आहे. निकृष्ट दर्जाचा शिधा देणे बंद करावे, अन्यथा गोरगरिबांच्या रक्षणासाठी आम्ही रस्त्यावर उतरू, असा इशारा गजभिये यांनी सरकारला दिला आहे.

हेही वाचा – फडणवीसांना खारे पाणी पिण्याची, आंघोळ करण्याची विनंती करणार; ठाकरे गटाचा आजपासून अकोला-नागपूर मोर्चा

पशूंनाही चारण्यायोग्य नाही

वाटप करण्यात आलेली डाळ जनावरांनाही चारण्यायोग्य नाही. निकृष्ट डाळ वाटप करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या ठेकेदारावर अन्न व नागरी पुरवठा विभागाने कठोर कारवाई करावी, असे नेरी येथील तक्रारकर्ता शोभराज तिजारे म्हणाले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Distribution of mold pulses from government ration shop in neri village of akola district ksn 82 ssb
Show comments