चंद्रपूर : इयत्ता १० वीच्या परीक्षेत इंग्रजी पेपरदरम्यान शिक्षकाच्याच मदतीने सर्रासपणे ‘कॉपी’ सुरू असलेल्या परीक्षा केंद्रावर जिल्हा प्रशासनाने छापा टाकून कारवाई केली. हा प्रकार शनिवारी बल्लारपूर तालुक्यातील नांदगाव (पोडे) येथील गोपाळराव वानखेडे विद्यालयात घडला. येथे शिक्षकाच्या मुकसंमतीने विद्यार्थी ‘कॉपी’ करीत असल्याचे उघडकीस आवे, या परीक्षा केंद्राची मान्यता रद्द करावी, असा प्रस्ताव प्रशासनाने पाठविला आहे. विशेष म्हणजे, हे विद्यालय परीक्षेदरम्यान ‘कॉपी’साठी प्रसिद्ध आहे.
शनिवारी इयत्ता १० वीचा इंग्रजीचा पेपर सुरू असताना जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांच्या निर्देशानुसार गोंडपिपरीच्या उपविभागीय अधिकारी अपुर्वा बासूर नांदगाव (पोडे) येथील गोपाळराव वानखेडे विद्यालयात धडकल्या.येथील वर्गखोली क्र. २ मध्ये पाहणी करीत असताना शिक्षक दीपक मुरलीधर तुराणकर हे विद्यार्थ्यांजवळ असलेल्या ‘कॉपी’ गोळा करीत असल्याचे दिसून आले. शिक्षक तुराणकर यांनी कॉपीबहाद्दर विद्यार्थ्यांवर कोणतीही कारवाई न करता त्यांना ‘कॉपी’ करण्याची मुकसंमती दिल्याचे निदर्शनास आले. तसेच शाळेतील इतर वर्गखोळ्यांमध्येही मोठ्या प्रमाणात ‘कॉपी’ सुरू असल्याचे आढळून आले.
आता या परीक्षा केंद्रावर कारवाई करण्यात येणार असून पुढील वर्षापासून गोपाळराव वानखेडे विद्यालय हे परीक्षा केंद्र रद्द करण्याचा प्रस्ताव माध्यमिक बोर्डाकडे पाठविण्यात येणार आहे. तसेच कॉपी करताना आढळून आलेल्या दोन विद्यार्थ्यांची प्रकरणे नोंद करून बोर्डाकडे वेगळी पाठविण्यात आली आहे.
‘कॉपी’ करण्यासाठी मदत करणारे शिक्षक दीपक तुराणकर यांच्याबाबतचा अहवाल बोर्डाकडे पाठवला जाईल. बोर्डाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे शिक्षणाधिकारी (माध्य.) राजेश पाताळे यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यात कुठेही परीक्षेदरम्यान कॉपी प्रकरणे निदर्शनास आल्यास नागरिकांनी परीक्षा पर्यवेक्षक किंवा शिक्षण विभागाला तत्काळ कळवावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे.