कर्मचाऱ्यांकडून नाराजीचा सूर; प्रशासन म्हणते, तयारी नियमानुसारच

नागपूर : विधानसभा निवडणुकीची अधिकृत घोषणा आयोगाने अद्याप केली नसतानाही जिल्हा प्रशासनाकडून मात्र निवडणूक प्रशिक्षणासह इतरही पूर्वतयारीला सुरुवात झाल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आश्चर्य व्यक्त केले जात आहे. असा प्रकार प्रथमच होत असल्याचा दावा त्यांनी केला असला तरी केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसारच पूर्वतयारी केली जात असल्याचे जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.

सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवडय़ात विधानसभा निवडणुकीची घोषणा केली जाईल, असा अंदाज प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात वर्तवला जात होता. मात्र, ही तारीख लांबतच चालली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा १९ सप्टेंबपर्यंत चालणार असल्याने तोपर्यंत तरी निवडणुकीची घोषणा होणार नाही हे निश्चित झाले आहे. दुसरीकडे प्रशासनाने मात्र एक महिन्यापासून निवडणूक पूर्वतयारी सुरू केली आहे. निवडणूक कामासाठी विविध विभागांकडून कर्मचाऱ्यांच्या याद्या मागवण्यात आल्या आहेत. प्रशिक्षणाचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले आहे. अधिसूचना जारी झाल्यावर कर्मचाऱ्यांच्या सेवा निवडणूक कामासाठी अधिग्रहीत करण्याचे अधिकार निवडणूक शाखेला मिळतात, मात्र त्याचा वापर आतापासूनच केला जात असल्याकडे काही कर्मचाऱ्यांनी लक्ष वेधले.

यासंदर्भात राज्य कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष अशोक दगडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही हा प्रकार प्रथमच होत असल्याचे मान्य केले. मात्र, पूर्वतयारीचा हा भाग असावा, असेही ते म्हणाले. जिल्हा निवडणूक विभागाच्या उपजिल्हाधिकारी राजलक्ष्मी शहा यांनीही हा नियोजनाचा एक भाग असल्याचे सांगितले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसारच ही पूर्वतयारी केली जात असल्याचे सांगत आयोगही याचा नियमित आढावा घेत आहे. यात गैर काहीच नाही, असेही त्यांनी लोकसत्ताशी बोलताना स्पष्ट केले.

जिल्हा निवडणूक अधिकारी व जिल्हाधिकारी अश्विन मुद्गल यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनीही निवडणुकीची अधिसूचना आणि पूर्वतयारी याचा काहीही संबंध नाही. आम्ही पूर्वतयारी करीत असल्याचे स्पष्ट केले.

उपस्थित राहणे बंधनकारक

जिल्ह्य़ात  ग्रामीण आणि शहर मिळून एकूण विधानसभेचे १२ मतदारसंघ आहेत. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सरासरी २७ हजार कर्मचारी व अधिकाऱ्यांची गरज भासणार आहे. त्यांच्यासाठी १९ सप्टेंबरपासून सुरेश भट सभागृहात प्रशिक्षण वर्ग आयोजित करण्यात आले आहे. या वर्गाला उपस्थित राहणे कर्मचाऱ्यांना बंधनकारक करण्यात आले आहे.