शेतकऱ्यांची वर्तमान अवस्था गंभीर आहे. जिवंतपणी कर्जासाठी फेऱ्या मारूनही शेतकऱ्यांना बँका उभ्या करत नाही. मात्र, महागाव तालुक्यातील हिवरा येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेतील कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांना चक्क मृत्यूनंतर कर्ज वाटप केल्याचा ‘चमत्कार’ घडला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दोन कोटींच्या या बनावट कर्ज वाटप प्रकरणात अखेर बँकेच्या ११ कर्मचाऱ्यांवर पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हे दाखल केले. जिल्हा बँकेच्या हिवरा शाखेचे व्यवस्थापक रवींद्र महानूर यांच्या तक्रारीवरून या बनावट कर्ज वाटप प्रकरणात हिवरा येथील निलंबित शाखा व्यवस्थापक संतोष नंदुसिंग राठोड, प्रकाश बापुराव राठोड व उमेश वसंतराव जोशी, निलंबित शाखा निरीक्षक निशिकांत प्रभाकर श्रीरामे, विष्णु रतन आडे व अशोक हिरासिंग राठोड, निलंबित वसुली अधिकारी सुरेश पंजाबराव भरवाडे, निलंबित रोखपाल अविनाश थावरा राठोड, सेवानिवृत्त शाखा व्यवस्थापक मुकिंदा राजाराम चवरे, कंत्राटी लिपीक बिबीचंद राठोड, चिलगव्हाण ग्रामविविध कार्यकारी सोसायटीचा कंत्राटी सचिव साहेबराव पुतळाजी नरवाडे यांच्या विरूद्ध विविध कलमान्वये फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

हेही वाचा >>> ‘खेला होबे’! शरद पवार यांच्या उपस्थितीत होणारा समीर देशमुख यांचा राष्ट्रवादी पक्षातील प्रवेश कोणी रोखला?

अमरावती येथील एका सीए कंपनीच्या सनदी लेखापालांनी २०२१-२२ या कालावधीत हिवरा शाखेमार्फत झालेल्या कर्जवाटपाचे अंकेक्षण केले. या कंपनीने दिलेल्या लेखा परीक्षण अहवालावरून विशेष स्थानिक समितीने हिवरा शाखेस संलग्न असलेल्या चिलगव्हाण ग्रामविविध कार्यकारी सोसायटीतील कर्ज वाटपाची तपासणी केली. येथे मृत शेतकऱ्याच्या नावावरही नियमबाह्य कर्जवाटप करण्यात आल्याचे आढळले. या सोसायटीत तब्बल ९१ लाख ७८ हजार ११ रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे प्राथमिक तपासात निदर्शनास आले. यासोबतच हिवरा शोखशी संलग्न असलेल्या पोहंडूळ, लेवा, खडका, धनोडा, शिरपूर, हिवरा येथील ग्राम विविध कार्यकारी सोसायटींमध्येही ९५ लाख ८९ हजार १७१ रूपयांचा गैरव्यवहार झाल्याचे तपासात आढळले. या सर्व संस्थांमिळून एक कोटी ८७ लाख ६७ हजार १८१ रूपयांचा गैरव्यवहार झाला आहे. दलालांना हाताशी धरून या कर्ज प्रकरणासाठी लागणारी बनावट कागदपत्रे मिळविण्यात आली. शेतकऱ्यांच्या शेताचे क्षेत्र कागदोपत्री वाढवून दुप्पटीने कर्ज देण्यात आले. उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर सोमवारी कर्मचाऱ्यांविरूद्ध फसवणुकीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. आता या कर्मचाऱ्यांना पोलीस अटक करतात की, हे कर्मचारी अटकपूर्व जामीन मिळवतात याकडे लक्ष लागले आहे. या कारवाईने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली असून शेतकऱ्यांची बँक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या विश्वासालाही तडा बसला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: District central bank employees distributed loans to farmers after death nrp 78 zws