वाशीम : आगामी काळात होऊ घातलेल्या निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपकडून पक्ष संघटनेत फेरबदल केले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भाजपात अंतर्गत पदाधिकारी फेरबदल होतील, असे बोलले जात होते. त्यात अखेर संघटनात्मक रचनेतील महत्त्वपूर्ण दुवा असलेल्या नवीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली असून वाशीम जिल्हाध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद सदस्य श्याम बढे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पक्षात मोठे फेरबदल करून प्रस्थापित नेत्यांना चांगलाच धक्का दिला आहे. दोन टर्म पासून वाशीम जिल्हाध्यक्ष पदावर असलेले आमदार पाटणी यांच्या कार्यकाळात झालेल्या ग्राम पंचायत, बाजार समितीच्या निवडणुकीत पक्षाला चांगली कामगिरी करता आली नव्हती. शहरी भागात प्रभाव असलेल्या भाजपला ग्रामीण भागात मात्र छाप पाडता आली नसल्याने पक्षाकडून ग्रामीण भागातील कार्यकर्त्याला संधी दिली आहे.
हेही वाचा >>>बुलढाणा: मलकापुरात निसर्ग कोपला! ‘कोसळधार’मुळे शेती पाण्यात, घरांमध्ये शिरले पाणी
श्याम बढे हे जिल्हा परिषद सदस्य असून भाजपचे एकनिष्ठ कार्यकर्ते म्हणून परिचित आहेत. गेल्या काही दिवसांपासून जिल्हाध्यक्ष बदलाचे संकेत मिळत होते. त्यासाठी अनेकजण इच्छुक होते. अखेर जिल्हा परिषद सदस्य श्याम बढे यांच्या गळ्यात जिल्हाध्यक्ष पदाची माळ पडली आहे.