दोन शाळकरी मुलांमध्ये झालेल्या वादात मुलांना समज दिल्याच्या कारणावरून चिखलीतील एका शाळेच्या मुख्याध्यापकास २०१८ मध्ये बेदम मारहाण केली होती. या आरोपीस बुलढाणा प्रमुख व जिल्हा न्यायालयाने एक वर्ष सश्रम करावास व दोन हजार दंडाची  शिक्षा सुनावली.  शेख आहात उर्फ शेख शौकत शेख अहमद असे आरोपीचे नाव आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश-२  एस बी डीगे  यांनी हा निकाल दिला. चिखली येथील तक्षशिला माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये ८ ऑगस्ट २०१८ रोजी ही घटना घडली होती.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>> बुलढाणा: पन्नास आंदोलकांचे उपोषण तिसऱ्या दिवशीही दुर्लक्षित, ‘भूमी हक्क’ मध्ये संताप

दोन विद्यार्थ्यांमध्ये वाद झाला होता. एका शिक्षकाने त्यात मध्यस्थी करून मुख्याध्यापक सुनील हरिभाऊ वळसे यांना कल्पना दिली होती. त्यावेळी दोन्ही मुलांना भांडण न करण्याची तंबी  सुनील वळसे यांनी दिली होती. दरम्यान, भांडण करणाऱ्या एका मुलाने त्याच्या घरी घडलेला प्रकार सांगितला. त्याचे वडील शेख आहात उर्फ शौकत शेख अहमद यांच्यासह शेख जहीर रशीद अहमद, मो. आवेज बागवान, शेख सकलेन शेख सलीम, शेख शाकीर शेख साबीर हे शाळेमध्ये गेले. दहाव्या वर्गात इंग्रजी विषय शिकवत असलेल्या मुख्याध्यापक वळसे यांना त्यांनी बेदम मारहाण केली. प्रकरणात गुन्हा दाखल करत तपास करून पोलिसांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.

हेही वाचा >>> काँग्रेसचे ठरले… भंडारा लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार निश्चित! लवकरच घोषणा!

सुनावणी दरम्यान १४ साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार असल्याने काही शिक्षकांची  साक्ष  महत्त्वाची ठरली. उभय बाजूंचा युक्तिवाद ऐकून बुलढाणा येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश (२) एस. बी. डिगे यांनी आरोपी शेख आहात उर्फ शेख शौकत शेख अहमद यास एक वर्ष सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एक महिना सश्रम कारावास यासह अन्य कलमान्वयेही शिक्षा सुनावली आहे. या सर्व शिक्षा आरोपी शेख आहात उर्फ शेख शौकत अहमद यास एकत्रित भोगावयाच्या आहेत. दरम्यान, या प्रकरणातील अन्य चार आरोपींची संशयाचा फायदा घेत न्यायालयाने मारहाणीच्या आरोपातून निर्दोष मुक्तता केली. प्रकरणात वादी पक्षातर्फे सहायक वकील ॲड. आशिष केसाळे यांनी काम पाहिले. चिखली येथील कोर्ट पैरवी पोलिस हवालदार  नंदाराम इंगळे यांनी न्यायालयीन मदत केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: District court sentenced accused to rigorous imprisonment for one year for brutally assault principal scm 61 zws