येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात केवळ शहरातीलच नव्हे तर ग्रामीण भागातील अनेक रुग्ण उपचारासाठी येतात. पूर्वीपेक्षा आता विविध आजाराचे निदान होत असले तरी अद्यापही अनेक समस्या कायम आहेत. सामान्य रुग्णालयातील दुसऱ्या माळयावर बालरुग्णांसाठी स्वतंत्र कक्ष आहे. परंतु सोमवारी रात्री वीजपुरवठा खंडीत झाल्याने संपूर्ण वार्डात तासभर अंधार पसरलेला होता. लाखो रुपयांचे इनव्हर्टर असतानाही त्याचा उपयोग काय ? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वाशीम शहरातील अकोला नाका परिसरात जिल्हा सामान्य रुग्णालयाची सुसज्ज इमारत आहे. येथे दररोज उपचारासाठी रुग्णांची गर्दी असते.
हेही वाचा >>> नागपूर : सावधान! बुधवारपासून राज्यभरातील वीज यंत्रणा ‘सलाईनवर’!
काही दिवसापूर्वी केंद्राच्या आरोग्य पथकाने जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट दिली होती. त्यापूर्वी संपूर्ण रुग्णालयाचा रातोरात कायापालट करण्यात आला होता. मात्र समिती जिल्हयातून जाताच सामान्य रुग्णालयातील स्थिती जैसे थे झाली आहे. येथे रुग्णांच्या सोईकरीता लिफ्ट लावण्यात आलेली आहे. एखादा गंभीर रुग्ण असल्यास त्याला या लिफ्टचा फायदा मिळेल, अशी आशा आता फोल ठरत आहे. सामान्य रुग्णालयातील लिफ्ट केवळ शोभेची वस्तू बनली असून ती कायम बंदच असते. येथील दुसऱ्या माळयावर लहान मुलांसाठी स्वतंत्र कक्ष आहे. सोमवारी रात्री वीजपुरवठा खंडीत झाल्याने संपूर्ण कक्ष तासभर अंधारातच होता. परिणामी लहान बालकांचे कुटुंबीय चांगलेच त्रस्त झाले होते. तसेच सामान्य रुग्णालयात रुग्णांचा एक्स रे काढल्यानंतर त्याला त्याची प्रत व्हाटसॲपवर किंवा ईमेलवर देण्यात येते. रुग्णांना एक्स रे मिळत नसल्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. यासह इतरही समस्यांचा रुग्णांना अनेकदा नाहक त्रास सहन करावा लागत असून याकडे आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी रुग्णांसह, नातेवाईकांमधून होत आहे.