चंद्रपूर : बंधाऱ्यांची निकृष्ट कामे करणाऱ्या इंद्रकुमार महाजन उके, बसंत सिंग आणि परवेज सुभान शेख या लोकप्रतिनिधींचा आशीर्वाद असलेल्या तीन कंत्राटदारांना गुन्हा दाखल करून काळ्या यादीत टाकण्याबाबतची नोटीस जिल्हा जलसंधारण अधिकारी नीलिमा मंडपे यांनी बजावली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

मृद व जलसंधारण विभाग, चंद्रपूर अंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोल्हापुरी बंधाऱ्यांची कामे झाली. त्यापैकी गोंडपिंपरी तालुक्यातील मौजा आर्वी व सिंदेवाही तालुक्यातील मौजा शिवनी येथील कोल्हापुरी बंधाऱ्यांचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून त्याची गुणवत्ता तपासावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत झामरे यांनी केली होती. त्याआधारे पालकमंत्री मुनगंटीवार यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना पत्र लिहून नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश दिले. तसेच गोंडपिंपरी तालुक्यातील तोहगाव व पाचगाव बंधाऱ्यांच्या कामातील भ्रष्टाचाराची चौकशी करण्याचेही निर्देश दिले. जलसंधारण अधिकाऱ्यांनी या कामाची चौकशी केली असता ते अतिशय निकृष्ट असल्याचे दिसून आले. यामुळे इंद्रकुमार उके यांना नोटीस बजावण्यात आली आहे.

हेही वाचा >>> Bacchu Kadu On BJP : “भाजपने मित्र बनून शिंदे गटाच्या गळ्याला सुरी लावली,” बच्‍चू कडू यांची टीका

बसंत सिंग यांच्या श्री जय गिरणारी कंन्स्ट्रक्शन कंपनीने भद्रावती तालुक्यातील मौजा विसलोन बंधाऱ्याचे काम केले. शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाने या बंधाऱ्याची पाहणी केली असता कामाची गुणवत्ता असमाधानकारक दिसून आली. बंधाऱ्याचे १९ खांब (पिल्लर) निकृष्ट असल्याने ते पाडून पुन्हा बांधावे, असे महाविद्यालयाने सुचवले. यानंतर ते १९ खांब पाडण्यात आले. कामाच्या गुणवत्तेबाबत कंत्राटदार गंभीर नसल्याने त्यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून दोन दिवसात अहवाल सादर करावा, असे निर्देश जलसंधारण अधिकारी नीलिमा मंडपे यांनी उपविभागीय जलसंधारण अधिकारी यांना दिले आहे.

हेही वाचा >>> “गणपती पूजेला काँग्रेसचा विरोध”, वर्धा येथील कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची टीका

याचबरोबर, निविदा प्रक्रियेत बनावट व खोटी माहिती सादर करून मृद व जलसंधारण विभागाची दिशाभूल केल्याप्रकरणी भद्रावती येथील कंत्राटदार परवेज सुभान शेख यांनाही फौजदारी गुन्हा दाखल करून काळ्या यादीत का टाकू नये, अशी नोटीस बजावण्यात आली आहे.

गुन्हा दाखल करण्याचीही शिफारस

अतिशय निकृष्ट कामे करणाऱ्या या कंत्राटदारांना जिल्हा जलसंधारण अधिकारी मंडपे यांनी वारंवार ताकीद दिली होती. मात्र, लोकप्रतिनिधींकडून दबाव आणून कंत्राटदारांनी निकृष्ट कामे करण्याचा सपाटा सुरूच ठेवला. अखेर जलसंधारण अधिकारी यांनी वरिष्ठांकडे तक्रार केली. त्यानंतर, या कंत्राटदारांवर फौजदारी गुन्हा दाखल करून त्यांना काळ्या यादीत टाकण्याची कारवाई तत्काळ करावी, अशी शिफारस मंडपे यांनी केली आहे.

परवेज शेख, बसंत सिंग व इंद्रपाल उके या तीनही कंत्राटदारांनी केलेली कामे अतिशय निकृष्ट आहेत. यामुळे कंत्राटदारांवर गुन्हा दाखल करावा आणि त्यांना काळ्या यादीत टाकावे, अशी शिफारस केली आहे. कंत्राटदारांना नोटीस बजावण्यात आली आहे. – नीलिमा मंडपे, जिल्हा जलसंधारण अधिकारी, चंद्रपूर.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: District water conservation officer issue notice to three contractors over poor canal work rsj 74 zws