लोकसत्ता टीम

नागपूर: अधिकाऱ्यांना एका चाकोरीत, सरकारने ठरवून दिलेल्या चौकटीतच काम करावे लागते. या चौकटी ब्रिटीशकालीन आहेत, त्याच आपण स्वीकारल्या आणि वर्षानुवर्षे त्याच पद्धतीने कामही केले जात आहे. अनेकदा ते परिस्थितीशी सुसंगत नसते, वेळखाऊ आणि अपारदर्शीही असते. पण केवळ सरकारी पद्धत असल्याने त्यात बदल करण्याचे धाडस अधिकारी करीत नाही. उलट आहे ते रेटून नेण्यावरच त्यांचा भर असतो. मात्र त्याला काही अधिकारी अपवाद असतात.

एखादा अधिकारी तंत्रज्ञान प्रिय असतो. त्याचा वापर जनहितार्थ होऊ शकतो हे ध्यानात आल्यावर पारंपरिक पद्धतीला बाजूला सारून नवीन काही करण्याचा प्रयत्न करतो. तो यशस्वी होतो. लोकांना त्याचा फायदा होतो आणि सरकारची पसंतीही मिळते. उपक्रम राज्यभर लागू केला जातो. त्याला उत्तम नवोपक्रम म्हणून पुरस्कार जाहीर होतो. हे सर्व करणाऱ्या आहेत नागपूरच्या विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी.

आणखी वाचा-नागपूर : ‘हिट अँड रन’! भरधाव कारच्या धडकेत बापलेकासह तीन ठार

काय आहे उपक्रम

नागपूर विभागात अतिवृष्टी व नैसर्गिक आपत्तीमुळे होणाऱ्या शेत पिकांच्या नुकसानीची पारंपारिक पध्दतीने नोंद केल्या जात होती. पंचनामा अचूक व वेळेत पूर्ण करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर करुन विजयलक्ष्मी बिदरी यांनी महाराष्ट्र रिमोट सेंन्सिंग एप्लिकेशन सेंटरच्या मदतीने एक ॲप विकसीत केले आहे. या ॲपच्या माध्यमातून पीक नुकसानीचे फोटो घेवून अचूक माहिती गोळा करणे सुलभ झाले आहे. ही अभिनव संकल्पना प्रायोगिक स्तरावर नागपूर विभागात राबविण्यात आली आहे.

फायदा काय होतो?

ई-पंचनामा या उपक्रमामुळे नुकसानीसंदर्भात अचूक माहिती गोळा करणे सुलभ झाले आहे. यामुळे वेळेची सुद्धा बचत होते. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत मिळण्यास सुलभ झाले आहे. ही पद्धत संपूर्ण राज्यात राबविण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. विभागाने सर्व सहा जिल्ह्यांमध्ये या ऍपची यशस्वी प्रायोगिक आणि क्षेत्रीय चाचण्या घेऊन सहजतेने, अचूकता, वेग आणि पारदर्शकता दर्शविली. ॲप वापरून विविध स्तरांवर कोणते पंचनामे केले जाऊ शकतात आणि मंजूर केले जाऊ शकतात याबद्दलची कल्पना प्रत्यक्षात यशस्वीरीत्या पार पाडली.

आणखी वाचा-भंडारा : कामगार पेटी वाटपदरम्यान चेंगराचेंगरी, सहा महिला गंभीर जखमी

उपक्रमाची दखल कोणी घेतली?

या संकल्पनेची दखल भारतीय लोक प्रशासन संस्थेतर्फे घेण्यात आली.श्रीमती बिदरी यांना लोक प्रशासनातील नवोपक्रमासाठीभारतीय लोक प्रशासन संस्था महाराष्ट्र शाखेचा लोक प्रशासनातील नवोपक्रमासाठी दिल्या जाणारा या वर्षीचा ‘डॉ. एस.एस.गडकरी’ पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष स्वाधीन क्षत्रिय यांनी दिली. श्रीमती विजयलक्ष्मी बिदरी यांची अमेरिका येथील विशिष्ट हॅम्फ्रे फेलोशिपसाठी निवड झाली आहे. श्रीमती बिदरी यांना प्रशिक्षणानंतर धनादेश आणि सन्मानचिन्ह देऊन पुरस्कृत करण्यात येईल. अशी माहिती, संस्थेचे अध्यक्ष स्वधीन क्षत्रिया यांनी दिली.