बुलढाणा: देऊळगाव राजाचे तहसीलदार श्याम धनमने यांची तत्काळ बदली करण्यात यावी, असा प्रस्ताव विभागीय आयुक्तांनी शासनाकडे सादर केला. त्यांच्यावर अनेक गंभीर स्वरूपाचे आरोप आहे. आयुक्त निधी पांडे यांनी राज्याचे अपर मुख्य सचिव यांच्याकडे धनमने यांच्या बदलीचा प्रस्ताव पाठविला आहे. महसूल कामात अनियमितता, निवडणूक व अन्य कामात हलगर्जीपणा, विना अर्ज कार्यालयात गैरहजर राहणे व १३ हजार ३०० ब्रास अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीकडे सोयीस्कर दुर्लक्ष केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे.
हेही वाचा >>> निकालाच्या प्रतीक्षेत असताना तलाठी भरती परीक्षा स्थगित होणार? न्यायालयात याचिका दाखल, काय आहे मागणी…
तत्कालीन सिंदखेडराजा एसडीओ भूषण अहिरे यांनी २५ मे २०२३ दिलेल्या भेटीत ते विनाअर्ज गैरहजर असल्याचे आढळून आले होते. त्यांनी सादर केलेल्या अहवालावरून बुलढाणा जिल्हाधिकारी यांनी मागील १० जुलै रोजी आयुक्तांकडे धनमणेविरुद्ध शिस्तभंग कारवाईचा प्रस्ताव सादर केला होता. दरम्यान, आयुक्तांनी शासनाकडे बदलीचा प्रस्ताव सादर केला आहे. ‘सामायिक चौकशीचा प्रस्ताव सादर करा’ जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी धनमने व अन्य सात कर्मचाऱ्यांविरुद्ध सामायिक चौकशीचा प्रस्ताव सादर करावा, असे आदेश आयुक्तांनी दिले आहे. अवैध रेती उत्खननप्रकरणी हे निर्देश देण्यात आले आहे.