संजय मोहिते
स्थानिय ‘शिवसाई’ परिवाराचे सर्वेसर्वा दत्तात्रय लहाने यांनी ‘अर्ध्या वरती संसाराचा डाव मोडल्या जाणाऱ्या’ दुर्देवी एकल जीवांचे पुनवर्सन करण्याचा धाडसी प्रयत्न केला अन तो यशस्वी देखील झाला आहे. त्यांचा हा प्रयोग जिल्ह्यात एका सामाजिक क्रांतीचे बीजारोपण करणारा ठरला.महात्मा ज्योतीबा फुले जयंती निमित्ताने एक आगळावेगळा प्रयोग करण्यात आला. बुलढाणा जिल्ह्यातील विधवा, घटस्फोटीत आणि विधुर महिला-पुरुषांसाठी परिचय मेळावा शिवसाई ज्ञानपीठात मंगळवारी संध्याकाळी उशिरा पार पडला. या मेळाव्यातून विधवा, घटस्फोटीत आणि विधुर महिला पुरुषांच् समुपदेशन करून त्यांचा संसार पुन्हा एकदा उभा करण्याचा प्रयत्न करण्यात आला. या परिचय मेळाव्यात तब्बल १५० महिला आणि १३० पुरुषांनी नोंदणी केली. या मेळाव्यानंतर नव्याने लग्न करण्यासाठी अनेक विधवा, विधुर, घटस्फोटित सरसावल्याचे चित्र दिसून आले. सात, आठ परिवारानी आपल्या घरातील अश्या व्यक्तींचे लग्न जुळविण्यासाठी बोलणी देखील सुरू केल्याचे सुखद वृत्त आहे.
दरम्यान, यावेळी आयोजक तथा माजी जिल्हापरिषद सदस्य डी एस लहाने मेळाव्यानंतर भावनिक झाल्याचे दिसून आले. त्यांनी हा धाडसी प्रयोग यशस्वी ठरेल की नाही याबद्धल खात्री नव्हती अशी कबुली दिली. लग्न झाल्यावर पतीचे निधन, किंवा काही कारणाने वाद होऊन घटस्फोट झाला अशी अनेक उदाहरणे आहेत. मात्र तिला दुसरे लग्न करण्याची इच्छा असेल तर त्यासाठी पुढाकार घेणे काळाची गरज ठरली असल्याचे त्यांनी सांगितले.
आईचे लग्न लावून देणारा मुलगा अन समाजाला प्रश्न विचारणाऱ्या वीरांगना
हेही वाचा >>>नागपूर:पक्षीमित्रांसाठी नवे मोबाईल ऍप , विद्यार्थ्यांसह संशोधकांना उपयुक्त
या मेळाव्यात काही विलक्षण व्यक्तिमत्वानी उपस्थितांशी संवाद साधताना वेगळे अनुभव ‘शेअर’ केले. आपल्या विधवा आईचे लग्न लावून देणारा युवक अन काही विधवांचे भाष्य आयोजक व उपस्थितांच्या काळजाचा ठाव घेणारे ठरले. खऱ्या अर्थाने पुरोगामी असलेल्या युवकाने आंतरजातीय विवाह केला. मात्र विधवा आईची अडचण व इच्छा लक्षात घेऊन तिचा विधिवत विवाह लावून दिला. यामुळे समाजाने टाकलेला अघोषित बहिष्कार, आई व ‘वडिलांची’ केलेली सेवा, गरोदर सुनेची सासूच्या लग्नातील उपस्थिती याचा तपशील त्याने सांगितला.
कोरोनामुळे पती गमावणाऱ्या एका महिलेने ‘विधवांना आनंदी राहण्याचा अधिकार नाही का? असा प्रश्न केला तेंव्हा सभागृहात अस्वस्थ शांतता पसरली. माहेरी आल्यावर मामी व अन्य नातेवाईकांनी सवाष्ण सारखे वागविले, लग्न व महालक्ष्मी पूजनात कसा कायम मान दिला हे त्यांनी सांगितले, तेंव्हा टाळ्यांचा एकच कडकडाट झाला. या कार्यक्रमामुळे लग्नाची मानसिकता तयार झाल्याचे काहींनी धीटपणे सांगितले.