चंद्रपूर : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी त्यांचे पक्षातील प्रमुख प्रतिस्पर्धी माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार गटाचे संघटनात्मक पातळीवर खच्चीकरण सुरू केले आहे. सर्वप्रथम काँग्रेसचे ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिवाकर निकुरे व आता काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांची पदमुक्त करण्यात आले आहे. एकाच महिन्यात दोन जिल्हाध्यक्षांना पदमुक्त केल्याने वडेट्टीवार गटात कमालीची अस्वस्थता असून प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्या विषयी तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
बाजार समितीच्या निवडणुकीवरून या जिल्ह्यात काँग्रेस पक्षातील अंतर्गत कलह पुन्हा एकदा समोर आला आहे. आता तर थेट खासदार बाळू धानोरकर व माजी मंत्री आमदार विजय वडेट्टीवार एकमेकांना पाण्यात पाहात आहेत. धानोरकर यांनी तर थेट वडेट्टीवार यांना चंद्रपूर लोकसभा निवडणुक लढून दाखवाच, मी ब्रम्हपुरी विधानसभा निवडणुकीत उभा राहतो आणि जिंकूनही येतो असे आवाहन दिले आहे. काँग्रेसच्या या दोन्ही नेत्याच्या भांडणामुळे दोन्ही गटांचे पदाधिकारी व कार्यकर्ते कमालीचे अस्वस्थ आहेत. अशातच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्याकडून वडेट्टीवार गटाचे अतिशय पद्धतशीर खच्चीकरन सुरू आहे. तर धानोरकर गटाला बळ दिले जात आहे. प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी एकाच महिन्यात वडेट्टीवार गटाच्या दोन जिल्हाध्यक्षांची विकेट घेतली आहे. पहिले तर काँग्रेसच्या ओबीसी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिवाकर निकूरे यांना संघटनात्मक पातळीवर त्रास देत राजीनामा देण्यास भाग पाडले. विशेष म्हणजे नीकुरे यांची नियुक्ती झाल्यानंतर अवघ्या एक महिन्यातच त्यांनी राजीनामा दिला. त्यांना चिमूर मध्ये तेथील काँग्रेसचे प्रस्थापित नेते काम करू देत नव्हते. आता बाजार समिती निवडणुक मध्ये भाजपशी युती केली असा ठपका ठेवत प्रकाश देवतळे यांना जिल्हाध्यक्ष पदावरून कार्यमुक्त केले.
हेही वाचा >>>एकशे दोन वर्षे जुन्या रुग्णालयाची वास्तू ठरतेय धोकादायक; डॉक्टर, कर्मचारी जीव मुठीत घेऊन देत आहेत सेवा
विशेष म्हणजे बाजार समितीच्या स्थानिक निवडणुकीत चंद्रपूर, राजुरा, चिमूर, भद्रावती येथे स्थानिक पातळीवर सहमतीच्या राजकारणात भाजप व काँग्रेसच्या नेत्यांनी भाजप व काँग्रेसच्या सदस्यांना आघाडीत सामावून घेतले होते. मात्र चंद्रपूर बाजार समितीत विजय उत्सव साजरा करताना भाजप जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे व काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी ढोल, ताशांच्या तालावर नृत्य केले. देवतळे यांच्या विरोधात धानोरकर गटाचा हातात कोलीत मिळाले. त्याच नृत्याची तक्रार झाली आणि प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी देवतळे यांना जिल्हाध्यक्ष पदावरून पायउतार केले. पटोले यांनी एकाच महिन्यात वडेट्टीवार गटाच्या दोन जिल्हाध्यक्षांची विकेट घेतली. यामुळे वडेट्टीवार गटात कमालीची अस्वस्थता आहे. विशेष म्हणजे पक्षाच्या पातळीवर पटोले व वडेट्टीवार एकमेकांचे प्रतिस्पर्धी आहेत. प्रदेशाध्यक्ष पदासाठी वडेट्टीवार यांचेही नाव अनेकदा समोर आले आहे. अशा स्थितीत पटोले यांनी वडेट्टीवार गटाचे चंद्रपूर जिल्ह्यात तसेच संघटनात्मक पातळीवर पद्धतशीरपणे खच्चीकरन चालविले आहे अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.