घरोघरी आणि व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये सनईच्या सुरात मंगलमय वातावारणात लक्ष्मीची मुहुर्तावरची पूजा.. व्यापाऱ्यांकडे वह्य़ांचे पूजन, नवीन वस्तूंची खरेदी, मिठाई वाटप.. फटाक्यांची मनमुराद आतषबाजी.. एकमेकांना शुभेच्छा व फराळाचा आस्वाद.. अशा आल्हाददायी वातावरणात नागपुरात लक्ष्मीपूजन उत्साहात साजरे झाले. लक्ष्मीपूजनानंतर सायंकाळी नागरिकांनी मुक्त हस्ते फटाके उडविल्यामुळे रंगबेरेगी आणि आकर्षक फटाक्यांमुळे आसमंत भरून गेला होता.
दिवाळीचा तिसरा दिवस म्हणजे लक्ष्मीपूजनाचा, घरोघरी आणि व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये सकाळपासून लक्ष्मीपूजनाची तयारी केली जात होती. सकाळपासून धामधूम आणि उत्साहाचे वातावरण होते. शहरातील विविध भागातील बाजारपेठेत मोठय़ा प्रमाणात लक्ष्मीची मूर्ती आणि इतर साहित्य खरेदीसाठी गर्दी केली होती. विशेषत: चितारओळीत अनेकांनी दुकाने थाटली होती. त्यामुळे सकाळच्यावेळी त्या भागात गर्दी झाली होती. घरोघरी आणि व्यापारी प्रतिष्ठांमध्ये लक्ष्मीपूजनाची तयारी करण्यात आल्यानंतर सायंकाळी शहरासह इतरही ठिकाणी लक्ष्मीपूजन झाल्यानंतर मोठय़ा प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. सायंकाळी सहानंतर आसंमत फटाक्यांच्या आवाजाने निनादून गेला होता. फटाक्यांच्या आवाजाबाबत मर्यादा आखून दिलेल्या विक्रेत्यांनी मोठय़ा आवाजाचे फटाके विक्रीसाठी ठेवले होते आणि नागरिकांनी नियमाचे पालन न करता फटाके उडवल्याचे चित्र दिसत होते. फटाक्याच्या आवाजाने आणि शोभेच्या फटाक्यामुळे शहरातील वातावरून दुमदुमून गेले होते. शहरात सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. व्यापारी प्रतिष्ठानांमघ्ये लक्ष्मीपूजनाच्यावेळी व्यापाऱ्यांनी वहीखात्याची पूजा केली.
सकाळच्यावेळी सगळीकडे उत्साहाचे वातावरण होते. लखलखत्या दिवाळीचा उत्साह द्विगुणीत करण्यासाठी शहरातील विविध भागात दिवाळीनिमित्त विविध संस्थेतर्फे मराठी हिंदी गीतांचे कार्यक्रम सादर करून रसिकांना सांगीतिक फराळाची जणू मेजवानी दिली. बडकस चौक मित्र परिवारातर्फे पं. बच्छराज व्यास चौकात दिवाळी पहाट कार्यक्रमात रसिकांना मेजवानी देण्यात आली. विनोद वखरे, मंजिरी वैद्य, मुकुल पांडे, यशस्वी भावे या कलावंतांनी गीते सादर केली. सायंटिफिक सभागृहात दिवाळी पहाट कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्या ठिकाणी अनिरुद्ध जोशी, निरंजन बोबडे, रुपाली बक्षी आणि इतर कलावंतांनी एकापेक्षा एक सरस गीते सादर केली. याशिवाय सक्करदरा, नंदनवन, शिवाजीनगर, लक्ष्मीनगर, गोपालनगर, रेशीमबाग परिसरात दिवाळी पहाटचे कार्यक्रम आयोजित करण्यात आले. नदनवन परिसरात नागरिकांनी वस्तींमध्ये रांगोळ्या रेखाटल्या होत्या. शहरातील विविध भागात झालेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमांच्या रसिकांनी चांगलीच गर्दी केली होती. या कार्यक्रमानिमित्त अनेक ठिकाणी रस्त्यांवर मोठमोठय़ा रांगोळ्याही काढण्यात आल्या होत्या. फटाक्यांच्या आवाजात, रस्त्यांवर उत्स्फूर्तपणे सादर करण्यात आलेल्या कार्यक्रमांच्या जल्लोषात दिवाळी पहाट चांगलीच रंगली. रस्त्यावरून येणाऱ्या-जाणाऱ्यांबरोबर शुभेच्छांची देवाण-घेवाण करतानाच हातात असलेल्या मोबाईललाही विश्रांती नव्हती. व्हॉटसअॅपवर शुभेच्छा संदेश दिले जात होते.
दिवाळी उत्साहात..
घरोघरी आणि व्यापारी प्रतिष्ठानांमध्ये सनईच्या सुरात मंगलमय वातावारणात लक्ष्मीची मुहुर्तावरची पूजा.
Written by झियाऊद्दीन सय्यदझियाउद्दीन सय्यद
आणखी वाचा
First published on: 13-11-2015 at 01:00 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Diwali celebrated with enthusiasm