|| महेश बोकडे
आहार तज्ज्ञांचा सल्ला
दिवाळी जशी दीपोत्सवासाठी ओळखली जाते तशीच ती घरी तयार होणाऱ्या गोड पदार्थासाठी अर्थात फराळांच्या विविध पदार्थासाठीही ओळखली जाते. घरोघरी शेव, चिवडा, चकल्या, शंकरपाळे, लाडू, करंज्या, बर्फीसह इतरही चमचमीत पदार्थ तयार केले जाते आणि त्यावर येथेच्छ तावही मारला जातो. मात्र, अधिक प्रमाणात त्याचे सेवन करणे ही आरोग्यासाठी बाधक असते, असा सल्ला आहार तज्ज्ञ देतात. त्यामुळे फराळ करा, पण जरा जपून असे म्हणण्याची वेळ आली आहे.
दिवाळीचा सन सर्वत्र आनंदात साजरा केला जातो. मुले असो किंवा ज्येष्ठ नागरिकांना या सणाची वाट असते. दिवाळीनिमित्त सर्व कुटुंबीय एकत्र येत असल्याने या सणाचा आनंद अधिक वाढतो. विविध फराळांचे विविध प्रकार खाण्याची पर्वणी असते. तळलेले, गोड आणि चटपटीत खाद्यपदार्थ बहुतांश घरी तयार केले जातात. दिवाळीच्या निमित्ताने ठिकठिकाणी फराळाचे आमंत्रणही दिले जाते. त्यामुळे पाच दिवसात यथेच्छ पदार्थ खाण्यावर मुलांचा आणि ज्येष्ठ नागरिकांचा भर असतो. मात्र, तळलेले पदार्थ, तसेच अधिक गोड पदार्थ खाण्याने आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतो, असे आहार तज्ज्ञांचे मत आहे.
हल्ली प्रत्येक व्यक्ती कामात व्यस्त राहतो. त्यामुळे तयार पदार्थ खरेदी करण्यावर त्यांचा भर असतो. या पदार्थासाठी वापरलेले साहित्य चांगल्या प्रतीचेच असेल याची खात्री नसते. अनेकदा त्यात भेसळ केली जाते.त्यामुळे तब्येत बिघडण्याचा धोका असतो. त्यामुळे शक्यतो घरी तयार केलेलेच खाद्यपदार्थ खाणे चांगले, असे आहार तज्ज्ञ सांगतात. ज्येष्ठ नागरिकांनी तळलेले किंवा अधिक गोड पदार्थ खाणे टाळलेलेच बरे.
अधिक खाणे हानिकारक
आहार तज्ज्ञानुसार प्रत्येक व्यक्तीला त्याची उंची, काम व वजनानुसार साधारण ५०० ते ७५० ग्रॅम तेल जेवणातून सेवन करणे गरजेचे आहे, परंतु दिवाळीत तेलकट पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे अशा वस्तू खाण्यावर नियंत्रण ठेवावे. खाण्याचे प्रमाण वाढल्याने पोटाचे विकारही उद्भवू शकतात. अपचनाचाही त्रास होऊ शकतो, असे आहार तज्ज्ञांनी सांगितले.
सुखा मेवा फायद्याचा
दिवाळीत पारंपरिक फराळ नियंत्रणात सेवन करण्यास हरकत नाही. गोड पदार्थ खाण्याऐवजी खजूर आणि अंजीरपासून तयार केलेली मिठाई फायद्याची आहे. नारळ, बेसन, कणिक यापासून तयार केलेली मिठाई खोव्यापासून तयार केलेल्या मिठाईच्या तुलनेत चांगली असते. मात्र, त्यात साखरेचे प्रमाण मर्यादित असावे, असे डायबेटिज केयर अॅन्ड रिसर्च सेंटर, नागपूरचे आहार तज्ज्ञ कविता गुप्ता यांनी सांगितले.
लालसर तेल नको
अनेकदा एकाच तेलात विविध पदार्थ तळले जातात. अधिक तापल्याने तेल लाल होते व ते आरोग्याला बाधक असते. त्यामुळे तेल लालसर झाल्यास त्याचा वापर टाळणेच योग्य, असे आहार तज्ज्ञ सांगतात.
कॅलरीज वाढते
एका व्यक्तीला दररोज १,३०० ते १,५०० कॅलरीजची आवश्यकता असते. दिवाळीत विविध पदार्थ खाण्याचे प्रमाण वाढते. शरीरात कॅलरीजचे प्रमाण वाढते. दिवाळीच्या सुट्टीमुळे बरेच लोक घरी आराम करतात. शरीराला श्रम होत नाही. त्यामुळे लठ्ठपणा वाढण्याची भीती असते.