वर्धा : भारतीय सण अन्य काही देशातही साजरे होत असतात. इंग्रजांनी आपल्यासोबत अन्य देशात नेलेल्या मजुरांनी त्यांची संस्कृती त्या त्या देशातही जोपासली. असाच एक ३६० द्वीप समुहांचा देश म्हणजे फिजी होय. फिजी गणराज्याचे उच्चायुक्त कमलेश शशी प्रकाश हे येथील महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या फाल्गुनी रंगोत्सव या होळीपश्चात् झालेल्या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून हजेरी लावून गेले. यावेळी त्यांनी फिजीतील समाजजीवन उलगडतांना काही रोचक बाबी सांगितल्या.
भारतातून १८४९ साली गिरमिटिया कामगारांची पहिली तुकडी फिजीला पोहोचली. ते इथलेच झाले. तेव्हापासूनच फिजी व भारत यांच्यात सांस्कृतिक नाते तयार झाले. इथले कामगार व हिंदी चित्रपटामुळे फिजीत हिंदी मोठ्या प्रमाणात बोलल्या जाते. या भाषेतील संवाद समजतात. हिंदी संस्कृतीमुळे फिजीतील जनता होळी, दिवाळी, महाशिवरात्री, गणेशोत्सवसारखे सण धुमधडाक्यात साजरे करतात. फिजीत हिंदी बळकट करण्यासाठी या विद्यापीठाची मदत घेऊ. तसेच पंतप्रधानांच्या मदतीने हिंदी केंद्र स्थापन केल्या जाईल, असा मानस शशी प्रकाश यांनी व्यक्त केला. त्याद्वारे विविध नव्या संधी निर्माण होतील, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
हेही वाचा – धक्कादायक! रक्षकच झाला भक्षक, तक्रारीसाठी आलेल्या युवतीवर ठाणेदाराने केला बलात्कार
कुलगुरू रजनीश कुमार यांनी भारतीय संस्कृतीचा ठेवा फिजीत समृद्ध असल्याबद्दल आनंद व्यक्त करीत विद्यापीठाच्या सहकार्याची हमी दिली. उच्चायुक्त प्रकाश यांनी यावेळी होळी नृत्य, शास्त्रीय गायन, रंगारंग कार्यक्रमाचा आनंद घेतला. डॉ. प्रियांका मिश्रा, डॉ. भारती, प्र – कुलगुरू शुक्ल व रागीट यांनी प्रकाश यांना उपक्रमांची माहिती दिली.