महेश बोकडे
नागपूर : एसटी महामंडळाकडून कर्मचाऱ्यांना ५ हजार रुपये दिवाळी भेट दिली जात आहे. परंतु महामंडळात कार्यरत अधिसंख्य पदावरील सुमारे ५९० कर्मचाऱ्यांना ही भेट मिळणार नसल्याचे पुढे आल्याने त्यांची दिवाळी अंधारात जाणार आहे.
युती सरकारच्या काळात २०१६ पासून तात्कालीन परिवहनमंत्र्यांनी सानुग्रह अनुदान दिवाळी भेट म्हणून देणे सुरू केले. गेल्या वर्षांपर्यंत कर्मचाऱ्यांना २ हजार ५०० रुपये, अधिकाऱ्यांना ५ हजार रुपये दिले जात होते. यावर्षी सगळय़ांना सरसकट ५ हजार रुपये इतकी रक्कम दिली जाणार आहे. मात्र याबाबत काढलेल्या परिपत्रकात महामंडळाने अधिसंख्या पदावरील कर्मचारी-अधिकाऱ्यांना ही भेट लागू राहणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. १८ ऑक्टोबर २०२२ रोजी कार्यरत अधिसंख्या कर्मचाऱ्यांनाही ही मदत मिळायला हवी, अशी मागणी महा राष्ट्र एस. टी. कर्मचारी काँग्रेसने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. त्यामुळे यावर मुख्यमंत्री काय निर्णय घेणार, याकडे कर्मचाऱ्यांचे लक्ष लागले आहे.
‘‘एसटी महामंडळ अधिसूचनेनुसारच कारवाई करते. या कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट दिली जात नाही. त्यांना मूळ वेतनच देय आहे.’’ अजित गायकवाड, महाव्यवस्थापक (क. व. औ. सं.) एसटी महामंडळ, मुंबई.
‘‘अधिसंख्य वा गैरअधिसंख्य कर्मचाऱ्यांना महामंडळाकडून समान वागणूक अपेक्षित आहे. या पद्धतीने कुणाला दिवाळी भेट नकारणे हे मानवाधिकाराचे उल्लंघन आहे. तातडीने या कर्मचाऱ्यांना भेट देऊन अन्याय दूर करावा.’’
– प्रशांत बोकडे, विभागीय सचिव, महाराष्ट्र एसटी कामगार संघटना, नागपूर विभाग.