नागपूर: केंद्रीय अर्थसंकल्पानंतर देशभरात सोन्याचे दर घसरले होते. परंतु दिवाळीच्या तोंडावर रोज सोन्याचे दर वाढताना दिसत आहे. शनिवारी (१९ ऑक्टोबर) दुपारी सोन्याच्या दराने सर्वोच्च दराचा नवीन विक्रम नोंदवला आहे. दरम्यान, दिवाळीतही सोन्याचे दर वाढण्याचे संकेत असल्याने दागिने खरेदीसाठी इच्छुकांमध्ये चिंता वाढली आहे.
सणासुदीत नागपूरसह देशभरात दागिने खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढते. तर लग्न समारंभ, बारसेसह इतरही अनेक कार्यक्रमात नागरिक भेट म्हणून सोने- चांदीच्या वस्तू देतात. त्यामुळे अनेकांचे दिवाळीतील सोन्याच्या दराकडेही लक्ष असते. नवरात्रीपूर्वी ३० सप्टेंबरला नागपुरातील सराफा बाजारात सोन्याचे दर सकाळी ११ वाजता २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७५ हजार ९०० रुपये, २२ कॅरेटसाठी ७० हजार ६०० रुपये, १८ कॅरेटसाठी ५९ हजार २०० रुपये, १४ कॅरेटसाठी ४९ हजार ३०० रुपये नोंदवले गेले. परंतु त्यानंतर सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे.
हे ही वाचा…”राणा दाम्पत्यासाठी पती-पत्नी एकत्रिकरण योजना राबविणार”, भाजप नेत्याची टीका
दरम्यान आता दिवाळी तोंडावर आहे. या सणामध्ये मोठ्या संख्येने ग्राहक दागिने खरेदी करतात. परंतु सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे ग्राहकांमध्ये चिंता वाढली आहे. नागपुरातील सराफा बाजारात शनिवारी (१९ ऑक्टोबर) दुपारी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी प्रति दहा ग्राम ७८ हजार रुपये, २२ कॅरेटसाठी ७२ हजार ५०० रुपये, १८ कॅरेटसाठी ६० हजार ८०० रुपये, १४ कॅरेटसाठी ५० हजार ७०० रुपये नोंदवले गेले. तर प्लॅटिनमचेही दरही १९ ऑक्टोबरला सकाळी ४४ हजार रुपये प्रति दहा ग्राम नोंदवले गेले. दरम्यान हल्लीच्या सोन्याच्या दरातील मोठ्या बदलामुळे सराफा व्यवसायिकांमध्येही चिंता वाढली आहे. परंतु सराफा व्यवसायिकांकडून मात्र हे दर आणखी वाढण्याचे संकेत असून आताच्या काळात सोने- चांदीमध्ये गुंतवणूक लाभदायक असल्याचा दावा केला जात आहे. दरम्यान १९ ऑक्टोबरला (शनिवारी) दुपारी सोन्याचे दर आजपर्यंच्या इतिहासात सर्वोच्च असल्याचा दावा नागपुरातील सराफा व्यवसायिक करत आहे. दिवाळीच्या काळात सोने-चांदीच्या दरात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा…गोंधळ घालून भाजयुमोने संविधान धोक्यात असल्याचे सिद्ध केले काय?
चांदीच्या दरातही मोठी वाढ
नागपुरातील सराफा बाजारात ३० सप्टेंबरला चांदीचे दर ९१ हजार ८०० रुपये होते. हे दर दिवाळीच्या तोंडावर १९ ऑक्टोबरला (शनिवारी) दुपारी ९६ हजार ३०० रुपये नोंदवण्यात आले. यामुळे दिवाळीच्या काळात चांदीच्या लक्ष्मीसह इतर देवांची चित्र असलेली नाणी महागण्याची दाट शक्यता आहे. दरवाढीचा परिणाम यंदाच्या दिवाळीत सराफा व्यवसायावर पडणार का? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.