अकोला: उच्च शिक्षण व रोजगाराच्या निमित्ताने पुणे-मुंबईला विदर्भातील तरुणाईचे लोंढेच्या लोंढे गेले आहेत. कुटुंबीयांसोबत दिवाळी साजरी करतांना ते गावी परत असतात. गावी जाण्यासाठी रेल्वे हा सगळ्यात परवडणारा आणि सोयीचा पर्याय असताना दरवर्षी आरक्षणाची बोंब असते. रेल्वेच्या नियमाप्रमाणे ११ नोव्हेंबर २०२३ चे दिवाळी आरक्षण १२० दिवस आधी सुरू झाले आणि अवघ्या काही मिनिटात आरक्षण फुल्लही झाले. त्यामुळे हजारो प्रवाशांच्या पदरी निराशाच पडली.
सणासुदीच्या काळात रेल्वेमध्ये प्रचंड गर्दी असते. दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक जण आपले घर गाठतात. पुणे, मुंबईवरून विदर्भात येणाऱ्यांचे प्रमाण विदर्भात प्रचंड असते. प्रवासासाठी रेल्वे सर्वात सोयीस्कर व सुरक्षित माध्यम आहे. त्यामुळे प्रत्येक प्रवाशाचा ओढा आरक्षण करून आपली सीट बुक करण्याकडे असतो. दिवाळीतील रेल्वे आरक्षण काही मिनिटांत फुल्ल झाले.
हेही वाचा… नागपूर : बीएस्सी नर्सिंगच्या वसतिगृहातील पाणी दूषित
अनेकांना तिकीट खिडकीवरून ‘वेटिंग’ तिकीट घेऊन परतावे लागले तर ऑनलाइन बुकिंग करणाऱ्यांना ‘रिग्रेट’ मेसेज पाहावा लागला. आपल्या हक्काच्या रेल्वेत एक कन्फर्म तिकीट मिळवायला झगडावे लागत आहे, अशी तीव्र भावना प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.
हेही वाचा… नागपूरः महिलेच्या आंघोळीची चित्रफीत काढणाऱ्या डॉक्टरची वसतीगृहातून हकालपट्टी
मुंबई-नागपूर, पुणे-नागपूर मार्गावर मोठ्या संख्येने गाड्या धावतात. मात्र, काही मिनिटात गाड्या फुल्ल होऊन रिग्रेट मेसेज कसा काय झळकू शकतो? यात नक्कीच काहीतरी गडबड आहे. तिकीट काढणारे दलाल आणि रेल्वेचे अधिकारी-कर्मचारी मिळून हा काळाबाजार करत आहेत का? त्याची चौकशी व्हायला हवी, अशी मागणी प्रवाशाने केली.
हेही वाचा.. Shravan 2023: सणांचा राजा श्रावण झालाय सुरू, काय आहे महत्व, वाचा
दिवाळीसाठी गाड्यांचे आरक्षण अवघ्या एका मिनिटात फुल्ल झाल्याचे समोर आले आहे. दरवर्षी थोड्याफार फरकाने असाच प्रकार घडत असल्याने अनेक प्रवाशांना गावी जाताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. या तिकीटाच्या आरक्षणांची मध्य रेल्वेनी चौकशी करावी, अशा रेल्वे दलालांवर नियंत्रण ठेवावे, अशा मागणीने जोर धरला आहे.
११ नोव्हेंबर २०२३ स्लीपर कोच आरक्षण स्थिती
मुंबई ते अकोला
- ज्ञानेश्वरी एक्सप्रेस – ६३ वेटिंग
- भुवनेश्वर एक्सप्रेस – ७९ वेटिंग
- गीतांजली एक्सप्रेस – ९८ वेटिंग
- विदर्भ एक्सप्रेस – १३५ वेटिंग
- मेल एक्सप्रेस – ६४ वेटिंग
- अमरावती एक्सप्रेस – १०५ वेटिंग
- शालिमार एक्सप्रेस – ७५ वेटिंग
पुणे ते अकोला
- हमसफर एक्स्प्रेस – ६०
- आझाद हिंद एक्सप्रेस – REGRET
- गरिबरथ एक्सप्रेस – REGRET
- महाराष्ट्र एक्सप्रेस – REGRET
विदर्भातील प्रवाशांच्या सोयीसाठी दिवाळीत अतिरिक्त रेल्वे गाड्या सोडण्यात याव्या. याबाबत केंद्रीय रेल्वे मंत्र्यांना पत्र लिहून आरक्षणातील गैरप्रकारांची चौकशी करण्याची मागणी करणार आहोत. – ॲड. अमोल इंगळे, रेल्वे प्रवाशी संघटना.