नागपूर: डी.जे.च्या भयंकर आवाजाने हृदयरोगाचा झटका आल्याचे आपण ऐकले आहे. मात्र, हिंगणा तालुक्यातील मौजा मोंढा पांजरी येथील दुर्गादेवी विसर्जन सुरू असताना एक अनोखी घटना घडली. विसर्जनासाठी डी.जे.ची व्यवस्था करण्यात आली होती. गावातून विसर्जनाची मिरवणूक सुरू असताना डी.जे.च्या आवाजाने झाडावर असलेले मधमाश्यांचे मोहोळ उडाले.
उडाताच त्यांनी लोकांचा पाठलाग करायला सुरुवात केली. मधमाशा मागे लागल्याने लोकांना पडताभूई झाले. दोन किलोमिटरपर्यंत या मधमाश्यांनी नागरीकांचा पाठलाग करत त्यांना चावा घेतला. यामध्ये जवळपास ३० महिला, पुरुष व युवक जखमी झाले असून त्यांना ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. येथील जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक श्रीराम महाजन यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा संपूर्ण घटनाप्रसंग अत्यंत भयावह होता.
हेही वाचा… नागपूर पोलीस धावले, निरोगी राहण्याच्या संदेश देण्यासाठी नाचले…
डी.जे.चा आवाज इतका मोठा होता की संपूर्ण मोहळ आवाजाने उडाले. आणि नागरीकांचा पाठलाग करत सुटले हेाते. लोक जमेल तिकडे पळू लागले. यात काही जण चांगलेच जखमी झाले असेही महाजन यांनी सांगितले.