संजय मोहिते, लोकसत्ता
समृद्धी महामार्गावरील पिंपळगाव खुंटा (सिंदखेड राजा) येथे झालेल्या भीषण अपघातात तब्बल २५ प्रवाशी जळून राख झाले होते. या प्रवाशांचा ‘डीएनए’ अहवाल प्राप्त झाला असून सर्व प्रवाशांची ओळख पटली असल्याची माहिती तपास अधिकारी मेहकरचे पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदिप पाटील यांनी दिली आहे. याशिवाय घटनास्थळी च्या अवशेषांचे फॉरेन्सिक अहवाल देखील प्राप्त झाल्याची पूरक माहितीही त्यांनी दिली.
हेही वाचा >>> भंडारा जिल्ह्यावर विजेचा कहर, तीनजण ठार, चार जखमी, पवनी तालुक्यानंतर मोहाडी तालुक्यातही विजेचे तांडव
नियमित कामकाज, चार तालुक्यातील कायदा- सुव्यवस्थेची जवाबदारी सांभाळत, ‘एसडीपीओ’ पाटील यांनी या भीषण दुर्घटनेचा तपास वेगाने पूर्ण करीत आणला आहे. जेमतेम वीसेक दिवसात त्यांनी नियमित व तांत्रिक तपासाचा तपासाचा निर्णायक टप्पा गाठला आहे. या पार्श्वभूमीवर ‘लोकसत्ता’ सोबत बोलताना त्यांनी आजवरचा तपास उलगडून सांगितला. या दुर्घटनेत मृत २५ प्रवाशांचे देह जळून खाक झाले होते. त्यामुळे त्यांची ओळख पटविण्यासाठी ‘डीएनए टेस्ट’ करणे क्रमप्राप्त ठरले होते. अमरावतीसह राज्यातील तज्ज्ञांच्या मदतीने बुलढाण्यात त्यासाठी नमुने घेण्यात आले. या चाचणीचे अहवाल बुलढाणा पोलिसांना प्राप्त झाले असून सर्व मृतकांची ओळख पटल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले. तसेच मृतांच्या नातेवाईकांना मृत्यू प्रमाणपत्र देण्यात आले असून ‘क्लेम’ करणे व अन्य कार्यवाहीसाठी ही प्रमाणपत्रे सहाय्यक ठरणार आहे. अपघात स्थळ परिसरातील अवशेष, वस्तू, उपकरणे, सुटे भाग आदींची ‘फॉरेन्सिक’ चाचणी करण्यासाठी अमरावतीला पाठविण्यात आले होते. त्याचा अहवालही प्राप्त झाल्याचे पाटील यांनी सांगितले.
हेही वाचा >>> रेल्वेने प्रवास करताय…? मग, आधी हे वाचा…. नागपूरमार्गे धावणाऱ्या १६ रेल्वेगाड्यांना विलंब
फायर ऑडिट अन एआरटीओ अहवाल घटनेनंतर दुर्घटनाग्रस्त विदर्भ ट्रॅव्हल्सच्या( एमएच २९ बीई १८१९) बसचे ‘ फायर ऑडिट’ करण्यात आले होते. एका खाजगी संस्थेतर्फे ही कार्यवाही करण्यात आल्यावर त्याचा अहवाल थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर करण्यात आला आहे. मात्र निर्णायक असलेला बुलढाणा उप प्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांचा अहवाल अजून अप्राप्त आहे. यात परिवहन विभागाच्या पथकाने केलेली तपासणी, वाहनात करण्यात आलेले ‘मोडीफिकेशन’ नियमानुसार होते का, वाहनाचे आणिबाणीच्या प्रसंगात वापरण्यात येणाऱ्या ‘एक्सिट डोअर’ ची स्थिती याची कारणमीमांसा अपेक्षित आहे. हा अहवाल खातल्यातही महत्वाचा घटक ठरू शकतो.