नागपूर : “राजकीय क्षेत्रात काम करताना ८० टक्के समाजकारण केले तर नेत्यांना राजकारण करण्याची कधीही गरज पडणार नाही”, असा सल्ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला. केंद्र सरकारच्या राष्ट्रीय वयोश्री योजनेतंर्गत उत्तर-पूर्व नागपूर आणि नागपूर ग्रामीण क्षेत्रातील अपंगांना गडकरी यांच्या हस्ते साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.
कामठी येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाला खासदार कृपाल तुमाने, जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकड्डे , आमदार टेकचंद सावरकर, आशीष जैयस्वाल उपस्थित होते.
केंद्र सरकारच्या योजनेतंर्गत केवळ नागपूर शहरातीलच नव्हे तर जिल्ह्यातील अपंगाना नि:शुल्क साहित्य उपलब्ध करून त्यांना स्वत:च्या पायावर उभे करण्यासाठी आतापर्यंत ५० हजारपेक्षा अधिक साहित्य वाटप करण्यात आले आहे. राजकीय क्षेत्रात काम करताना ८० टक्के समाजकारण केले तर राजकारण करण्याची गरज पडणार नाही. समाजातील गोरगरीब, अन्यायग्रस्त आणि अपंगांसाठी काम केले तर आपल्याला आनंद मिळत असतो. ज्यांच्यासाठी आपण काम करतो त्याचे आशीर्वाद मिळाले तर आपले जीवन सुखकर होत असते, असेही गडकरी म्हणाले.