चंद्रपूर : भारतीय स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये बनावट आयकर रिटर्न्स व चुकीचे अंकेक्षण दाखवून कोट्यवधींचा घोटाळा करण्यात आला. याप्रकरणी कनिष्ठ अधिकारी व कर्जदारांना अटक करण्यात आली. मात्र, अजूनही राजकीय दबावामुळे मोठे बिल्डर्स, सनदी लेखापाल, तसेच बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाई झाली नाही. त्यामुळे फॉरेन्सिक ऑडिट करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा आणि त्वरित अटक करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजीव कक्कड यांनी केली.
कक्कड पत्रपरिषदेत म्हणाले की, जिल्हा पोलीस अधीक्षकांना भेटून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनासुद्धा पत्र पाठविण्यात आले आहे. येत्या १५ दिवसांत एसबीआय घोटाळा प्रकरणाची चौकशी करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्याची मागणी केली आहे. अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी याविरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करेल अशी चेतावणी कक्कड यांनी यावेळी दिली.
हेही वाचा – नागपूर : कामगार कल्याण केंद्र, की असामाजिक तत्त्वाचा अड्डा?
याप्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे २०२० मध्ये करण्यात आली होती. सुरुवातीला रामनगर पोलिसांनी उत्तम कार्य करून ४० जणांविरोधात गुन्हा दाखल केला. त्यांनतर राजकीय दबाव आल्यानंतर कारवाई थंडबस्त्यात पडली. बँकेचा अधिकारी, एक दलाल, १४ ग्राहकांना अटक करण्यात आली होती. गोर-गरीब व असहाय्य लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. मात्र, बँकेचे मोठे अधिकारी, बांधकाम व्यावसायिक, अंकेक्षण अधिकारी यासह इतर मोठे मासे मोकळे फिरत असून त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही.
हेही वाचा – अमरावती : नामांकित विकासकांचा वाद पोहोचला पोलीस ठाण्यात; फसवणुकीचा गुन्हा दाखल
सिनर्जी वर्ल्ड, देऊळ कंस्ट्रक्शन, डीएसके या बांधकाम व्यावसायिकांच्या ग्राहकांनी बनावट आयकर रिटर्न्स दाखवून अधिकचे कर्ज मंजूर करवून घेतले आहे. याप्रकरणात मागील सव्वा वर्षापासून पोलिसांनी कोणतीही कारवाई केली नाही. या प्रकरणाचे मुख्य करविते बाहेर मोकळे फिरत असल्याने त्यांना राजकीय आशीवार्द असल्याचे स्पष्ट होत असल्याने पोलिसांच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे फॉरेन्सिक ऑडिट करून दोषारोपपत्र दाखल करण्याची मागणी कक्कड यांनी केली आहे. पत्रपरिषदेला युवक काँग्रेसचे नितीन भटारकरसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.