प्रशांत देशमुख, लोकसत्ता

वर्धा : वर्धा लोकसभा मतदारसंघ इंडिया आघाडीतील मित्रपक्षांस सोडल्या जाणार असल्याच्या चर्चेने निष्ठावंत काँग्रेसजन अस्वस्थ झाले आहेत. इंडिया आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या काँग्रेसने वर्धेची जागा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादी पवार गटास सोडण्याचे ठरविले व तयारीसाठी कामाला लागण्याची पवारांची सूचना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी ऐकली. यामुळे काँग्रेस नेते, जिल्हा पदाधिकारी, कार्यकर्ते नाराज झाले. त्यांनी आपली भावना जिल्हाध्यक्ष मनोज चांदुरकर यांच्याकडे व्यक्त केली. त्याची त्वरित दखल घेत चांदुरकर यांनी थेट पक्षाध्यक्षांना मेल करीत भावना मांडल्या.

आणखी वाचा-विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना लाक्षणिक उपोषणाचा इशारा का द्यावा लागला? जाणून घ्या…

आपला पक्ष आघाडीत मित्र पक्षांना सोबत घेत आगामी लोकसभा निवडणुका लढत आहे. हे क्षेत्र महात्मा गांधी यांच्या वास्तव्याचे तसेच स्वातंत्र्यालढ्याच्या अनेक घडामोडीचे साक्षी आहे.पण आता हे क्षेत्र आगामी लोकसभा निवडणुकीत मित्र पक्ष असलेल्या शरद पवार गटास जाण्याची चर्चा जोरात आहे.असा निर्णय झाल्यास तो अत्यंत चुकीचा ठरणार.या क्षेत्रात राष्ट्रवादीचा काहीच प्रभाव नाही. तिकीट त्यांना सोडल्यास आघाडीची एक जागा कमीच होणार. तसे करू नका. जर ही जागा अन्य पक्षासाठी सोडल्यास काँग्रेस भाजप यांची साठगाठ असल्याचा संदेश लोकांना जाणार. आपल्या काँग्रेसकडे सक्षम उमेदवार असून त्यांचाच विचार करावा. म्हणून आपल्यास कळकळीची विनंती की अश्या घडामोडीत हस्तक्षेप करावा व वर्धा मतदारसंघ काँग्रेसीनेच लढवावा यासाठी स्पष्ट भूमिका घ्यावी, असे म्हणणे काँग्रेस जिल्हाध्यक्ष चांदुरकर यांनी राष्ट्रीय अध्यक्ष खरगे यांना पाठविलेल्या पत्रातून मांडले आहे. पक्षाबाबत चिंता व्यक्त करणारे हे पत्र काँग्रेस श्रेष्टी किती गांभीर्याने घेतात, हे पुढेच दिसेल.

Story img Loader