उच्च न्यायालयाचे पोलीस आयुक्तांना आदेश

नागपूर : गणेशपेठ मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील खासगी बसगाडय़ा २०० मीटर परिसरात उभ्या न करण्याच्या उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांवर कारवाई करा, कारवाई करताना पोलिसांवर कुणी हल्ले करीत असल्यास ते खपवून घेतले जाणार नाही. पोलीस आयुक्तांनी हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी आणि त्यांची नावे उच्च न्यायालयात सादर करण्याचे आदेश गुरुवारी न्या. रवि देशपांडे आणि न्या. विनय जोशी यांनी दिले.

गणेशपेठ बसस्थानक परिसरात मोठय़ा प्रमाणात खासगी बसगाडय़ाचे थांबे आहेत. या गाडय़ा रस्त्यावर उभ्या राहतात. शिवाय ऑटोचालकही वेडीवाकडी वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. यासंदर्भात न्यायालयाने स्वत: जनहित याचिका दाखल करून घेतली. त्या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायालयाने २२ मार्च २०१८ ला बसस्थानकापासून दोनशे मीटर परिसरात खासगी बस उभी करण्यास मनाई केली होती. खासगी बस कंपन्यांनी

हमीपत्र लिहून स्वत:च्या वाहनांकरिता वाहनतळ निर्माण करून रस्त्यावर वाहने उभी न करण्याचे आश्वासन दिले होते, पण त्याचे पालन होत नाही. त्यामुळे संबंधितांवर अवमान कारवाई करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली. त्या याचिकेवर न्यायालयाने पोलीस व इतरांना नोटीस बजावली असून प्रतिवादींना ११ एप्रिलपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले. त्याशिवाय अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. असे प्रकार खपवून घेतले जाणार नसून पोलीस आयुक्तांनी हल्लेखोरांची नावेही सादर करावी, असे न्यायालयाच्या आदेशात नमूद आहे. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. अंजन डे, अ‍ॅड. अपूर्व डे आणि राज्य सरकारतर्फे अ‍ॅड. शिशिर उके यांनी बाजू मांडली.

आरोपींना पोलीस कोठडी

गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत वाहतूक पोलिसांवर हल्ला करणाऱ्या ऑटोचालकांविरुद्ध खुनाचा प्रयत्न, शासकीय कामात अडथळा निर्माण करणे आदी कठोर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी सोनू कांबळे रा. बेलतरोडी व मयूर राजूरकर रा. रामबाग यांना अटक करण्यात आली. त्यांना प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकाऱ्यांसमक्ष हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यांच्याशिवाय अन्य आरोपींना अटक करण्यासंदर्भात पडताळणी सुरू असल्याची प्रतिक्रिया वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील गांगुर्डे यांनी दिली.

खासगी बसेसवर कारवाई करा

रस्त्यांवर खासगी बस उभ्या करण्यात येत असल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या चलचित्रात दिसत आहे. त्याची सीडी उच्च न्यायालयात सादर करण्यात आली असून पोलीस आयुक्तांनी ती सीडी कनिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपासून नियमांचे उल्लंघन करणाऱ्या संबंधितांवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले.

कायदा हाती घेऊन पोलिसांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. अशा आरोपींवर एमपीडीए किंवा हद्दपार करण्यासंदर्भात प्रस्ताव तयार करण्यात येईल. असे प्रकार खपवून घेतले जाणार नाही. यासंदर्भात गुरुवारच्या गुन्हे आढावा बैठकीत सर्व अधिकाऱ्यांना निर्देश देण्यात आले आहेत.

– डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलीस आयुक्त.

Story img Loader