अकोला : मुलांमध्ये आत्मविश्वासाचा अभाव असल्यास ते ऑटिझम मानसिक विकारग्रस्त असू शकतात. लक्षणे दिसू लागताच योग्य काळजी घेण्याची गरज आहे, अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बळीराम गाढवे यांनी दिली. संयुक्त राष्ट्र संघाच्या घोषणेनंतर जागतिक ऑटिझम जागरूकता दिन दरवर्षी २ एप्रिल रोजी साजरा केला जातो. हा एक मानसिक आजार आहे, जो पहिल्यांदा मुलांमध्ये दिसून आला होता. जगभरात या आजाराबाबत जनजागृती करण्यासाठी दरवर्षी विविध उपक्रम राबविले जातात.
ऑटिझम म्हणजे काय?
तज्ज्ञांच्या मते, ऑटिझम हा एक प्रकारचा मानसिक विकार आहे. मुलांमध्ये हा आजार एक ते तीन वर्षांच्या दरम्यान सुरू होतो. या आजारामुळे मुलांच्या मेंदूचा योग्य विकास होत नाही. एकदा हा आजार आढळला की तो लवकर बरा होऊ शकत नाही. यामुळे मुलांचा मेंदू संकुचित होतो. त्यामुळे मुलं कुटुंब आणि मित्रांपासून दूर राहू लागतात.
ऑटिझम’ची लक्षणे काय आहेत?
मुले इतरांशी पटकन नजर मिळवत नाहीत. ते त्यांच्याच विश्वात हरवलेले असतात. भाषा शिकण्यात अडथळे निर्माण होतात. कोणाचा आवाज ऐकून प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत. सामान्य मुलांपेक्षा ही मुले वेगळी दिसू लागतात. जर तुमचे मुल नऊ महिन्यांचे असेल आणि हसत नसेल किंवा नीट लक्ष देत नसेल तर ही ‘ऑटिझम’ची लक्षणं असू शकतात. अशी लक्षणे दिसल्यास ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधून काळजी घेण्याची गरज आहे. लक्षणे दिसू लागल्यानंतर ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधा. मुलाशी चांगले वागा. मुलाला खेळण्यासाठी साधी खेळणी द्या. मुलाची दुसऱ्या मुलाशी तुलना करू नका. मुलाची नेहमी नवीन लोकांशी ओळख करून द्या. मुलाला मैदानी खेळ खेळायला लावा आणि मुलाचा आत्मविश्वास वाढवा. छायाचित्रांद्वारे मुलाला गोष्टी समजावून सांगा. मुलाच्या आहार आणि जीवनशैलीकडे विशेष लक्ष दिले पाहिजे.
ऑटिझमवर अजून कोणताही अचूक उपचार उपलब्ध नाही. मुलाची स्थिती पाहून काय उपचार करायचे हे डॉक्टर ठरवतात. थेरपी, बिहेवियर थेरपी, स्पीच थेरपी, ऑक्युपेशन थेरपी, आय कॉन्टॅक्ट थेरपी, फोटो थेरपी आदी थेरपी त्याच्या उपचारात केली जाते. या थेरपीने जवळपास सर्व मुले बरी होतात. मुलांच्या उपचारात डॉक्टरांबरोबरच पालकांनीही विशेष लक्ष देणे आवश्यक असल्याचे डॉ. बळीराम गाढवे यांनी सांगितले.