भंडारा : लाखनी तालुक्यातील केसलवाडा /वाघ येथील महायुतीच्या प्रचारसभेत काँग्रेसचे डॉ. चंद्रकांत निंबार्ते यांनी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.साकोली विधानसभा क्षेत्रातील डॉ. निंबार्ते लाखनी तालुक्यातले असून महाविकास आघाडीचे उमेदवार नाना पटोले यांच्यावरील त्यांची नाराजी त्यांनी सभेत बोलताना व्यक्त केली आहे.
डॉ. चंद्रकांत निंबार्ते हे काँग्रेसच्या डॉक्टर सेलचे भंडारा जिल्हाध्यक्ष म्हणून कार्यभार पाहत होते. काँग्रेसने त्यांना लोकसभेची उमेदवारी नाकारली, असा आरोप निंबार्ते यांनी केला आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी महायुतीचे उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांना पाठिंबा जाहीर केला. त्यांनी काँग्रेसला सोडचिठठी दिली का? असा सवाल केला जात आहे.
हेही वाचा >>>तब्बल १० वर्षांनंतर मधुकर कुकडे यांची भाजपात घरवापासी
डाँ. निंबार्ते यांना लोकसभा निवडणुकीत डावलून पटोले यांनी मर्जीतील डाँ. प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली याचे शल्य त्यांना आहे. पटोले यांच्या पक्षपाती धोरणाला कंटाळून महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाकडून नानाभाऊ पटोले हे रिंगणात असून, डाँ. निंबार्ते यांचा भाजपात प्रवेश झाल्यामुळे लाखनी तालुक्यात समीकरण बिघडू शकतो काय? अशा चर्चा आहे.