‘आयएमए’मध्ये सायकल क्लबची स्थापना
महेश बोकडे, नागपूर</strong>
सर्वसामान्यांच्या आरोग्याची काळजी घेणारे डॉक्टर स्वत:च्या आरोग्याप्रतीही जागरूक आहेत. त्यामुळेच शहरातील बहुतांश डॉक्टर सायकलच्या प्रेमात पडले असून इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)ने सायकल क्लबची स्थापना केली आहे. या क्लबकडूनही दरवर्षी विविध विषयांवर रॅली काढली जाते. त्यात सायकलचा समावेश असतोच.
शहरात अनेक कार्पोरेट रुग्णालये आहेत. शिवाय मेडिकल, मेयो हे दोन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय असलेले नागपूर हे राज्यातील एकमात्र शहर आहे. येथे महाराष्ट्राच्या विविध भागासह तीन राज्यातून मोठय़ा संख्येने रुग्ण येतात. शहरात सध्या एमबीबीएस या पदवीसह पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकत असलेले पाच हजारांवर डॉक्टर आहेत. त्यातील आयएमएचे सदस्य असलेले ३,५०० हून जास्त डॉक्टर आहेत. या सर्वासाठी आयएमएने काही वर्षांपूर्वी सायकल क्लब सुरू केले. त्यातील अनेक डॉक्टर नियमित सायकलिंग करीत असतात. आज शहरातील बहुतांश डॉक्टर कुटुंबाकडे किमान एक सायकल नक्कीच आहे. अनेक डॉक्टर सकाळी शहराच्या विविध भागात सायकल चालवताना दिसतात. त्यात महिला डॉक्टरांचीही संख्या मोठी आहे. सायकल चालवल्याने फुप्फुस, हृदय आणि स्नायूंचा चांगला व्यायाम होतो. तणाव व लठ्ठपणाही कमी होतो, असे हे डॉक्टर सांगत असतात.
‘‘आरोग्य सांभाळण्यासह पर्यावरणाच्या संवर्धनासाठीही आयएमएने सायकल क्लब स्थापन करून आठवडय़ात किमान एक दिवस सायकलने प्रवास करण्याचे आवाहन सर्व सदस्यांना केले होते. त्याला पन्नासाहून जास्त डॉक्टरांनी प्रतिसाद दिला आहे. हे डॉक्टर आठवडय़ात किमान एकदा सायकलवर फिरून सेवा देतात. एका डॉक्टर तर छिंदवाडय़ाला बाह्य़रुग्ण सेवा देण्यासाठी आजपर्यंत दोन ते तीन वेळा सायकलने गेले आहेत.’’
– डॉ. सत्कार पवार, सायकल क्लब, नागपूर.
‘‘ प्रत्येक डॉक्टरांवर कामाचा ताण वाढून तेही विविध आजाराने ग्रस्त होण्याचे प्रमाण वाढले आहे. याचे कारण व्यायामाकडे दुर्लक्ष हेच आहे. त्यामुळे डॉक्टरांमध्येही सायकलिंगची आवड वाढत आहे.’’
– डॉ. वर्षां ढवळे, इंडियन मेडिकल असोसिएशन, नागपूर.