चंद्रपूर : मराठा समाजाला ओबीसी प्रवर्गातून आरक्षण देऊ नये, या मागणीसाठी राष्ट्रीय ओबीसी विद्यार्थी महासंघाचे जिल्हाध्यक्ष रवींद्र टोंगे यांनी पुकारलेले बेमुदत अन्नत्याग आंदोलन कायम आहे. दरम्यान, बुधवारी मध्यरात्रीनंतर जवळपास दीड वाजताच्या सुमारास डॉक्टर उपोषण मंडपात दाखल झाले. टोंगे यांची प्रकृती खालावल्याचे सांगत त्यांना रुग्णालयात हलवण्याचा आग्रह प्रशासनाने धरला. मात्र, मराठा समाजाचे मनोज जरांगे यांच्यावर मंडपात उपचार आणि ओबीसी समाजाचे टोंगे यांना रुग्णालयात हलविण्यासाठी आग्रह का ? असा प्रश्न ओबीसी समाजबांधवांनी उपस्थित केला. यानंतर टोंगे यांच्यावर मंडपात उपचार करण्यात आले.
उपोषणकर्ते टोंगे यांची डॉक्टरांनी तपासणी केली असता त्यांचे शुगर कमी झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे त्यांना तातडीने रुग्णालयात हलविण्यात यावे, अशी सूचना डॉक्टरांनी केली. जिल्हा प्रशासनानेही त्यांना रुग्णालयात हलविण्यासाठी हालचाली सुरू केल्या. मात्र, टोंगे तथा तिथे उपस्थित संघटनेचे सचिन राजूरकर व २५ कार्यकर्त्यांनी त्याला विरोध केला. मराठा समाजाचे जरांगे यांच्यावर उपोषणस्थळी उपचार केले जात आहे. सर्व प्रकारच्या सेवा दिल्या जात आहे. मग ओबीसी समाजाचे उपोषणकर्ते टोंगे यांच्यावरही उपोषण मंडपातच उपचार करा, अशी मागणी करण्यात आली. यामुळे उपोषणस्थळी काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलीस बंदोबस्तदेखील वाढविण्यात आला. मात्र, परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून टोंगे यांच्यावर मंडपातच उपचार सुरू करण्यात आले.
हेही वाचा >>>सोयाबीनवर किड, बळीराजा संकटात; उत्पादनात घट होण्याची भीती
दरम्यान, जिल्ह्यातील राजकारण्यांना ओबीसी मते हवी, मात्र एक ओबीसी योद्धा समाजासाठी उपोषण करीत असताना लोकप्रतिनिधींनी त्याकडे पाठ फिरविल्याचे चित्र आहे. राज्याचे विरोधी पक्ष नेते, जिल्ह्याचे पालकमंत्री, मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष आणि आमदारही उपोषण मंडपाकडे फिरकले नसल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.