नागपूर: उपराजधानीतील विम्स रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल महिलेत गुंतागुंत वाढली. ज्येष्ठ प्रसूती तज्ज्ञ डॉ. जुझार फिदवी यांनी सिझरने नवजात बाळाची शस्त्रक्रिया करताच चार किलोचा ट्युमरही बाहेर निघाला. हा प्रकार बघून सगळेच थक्क झाले. हा ट्युमरही वेगळा करून डॉ. फिदवी यांनी महिलेला जीवदान दिले.
प्रसूती झालेली ३२ वर्षीय महिला ही नागपुरातील बजेरिया परिसरातील आहे. तिला एक मुलगाही आहे. त्यावेळची प्रसूतीही सिझरनेच झाली होती. घरात दुसऱ्यांचा पाळणा हलणार असल्याने संपूर्ण कुटुंब आनंदात होते. महिलेची नित्याने वेळोवेळी सोनोग्राफीसह इतरही तपासणी केली गेली. परंतु त्यात गर्भातील बाळाची स्थिती चांगली असली तरी ट्युमर निदर्शनात आला नाही. परंतु, डिसेंबरमध्ये केलेल्या सोनोग्राफीत एक मांसाचा लहान गोळा क्ष- किरण तज्ज्ञांच्या निदर्शनात आला. प्रसूती कळा सुरू झाल्यावर महिलेला सदरमधील विम्स रुग्णालयात दाखल केले गेले.
हेही वाचा… सचिन पाठोपाठ आता अनिल कुंबळे सुद्धा ‘भानुसखिंडी’ च्या दर्शनाला…
महिलेतील गुंतागुंत बघत डॉ. जुझार फिदवी, डॉ. आरती काळबांडे (स्त्रीरोग तज्ज्ञ), डॉ. मीनाक्षी हांडे (बधिरीकरण तज्ज्ञ), दिलीप आणि इतर शल्यक्रिया गृहातील कर्मचाऱ्यांची चमू तैनात झाली. सिझरच्या मदतीने नवजात बाळाला बाहेर काढले गेले. परंतु, सोबत एक चार किलो वजनाचा ट्युमर बाहेर येताच सगळे डॉक्टर व कर्मचारी थक्क झाले. तातडीने डॉ. फिदवी यांनी शिताफीने हा गोळाही वेगळा करून महिलेचा कमीत कमी रक्तस्त्राव होईल अशी काळजी घेतली. यशस्वी शस्त्रक्रियेच्या नियोजनातून महिलेला जीवदान मिळाले.
दरम्यान, प्रसूतीनंतर डॉक्टरांनी वजन केले असता महिलेने जन्म दिलेल्या बाळाचे वजन २.८ किलो तर काढलेल्या मांसाच्या ट्युमरचे वजन ४ किलो असल्याचे पुढे आले.
प्रसूतीदरम्यान काही महिलांच्या गर्भात कमी अधिक आकाराचे ट्युमर तयार होतात. आजपर्यंत अनेक ट्युमर शस्त्रक्रियेतून बाहेर काढले. परंतु, चार किलो वजनाचे ट्युमर फार कमी असतात. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर महिला व तिच्या बाळाची प्रकृती चांगली आहे. – डॉ. जुझार फिदवी, ज्येष्ठ स्त्रीरोग व प्रसूती तज्ज्ञ, नागपूर