वर्धा : क्रिकेट सामने जेवढे रोमांचक खेळीने गाजतात, तेवढेच ते अलिकडच्या काळात सट्टा बाजारामुळे गाजू लागले आहे. हे चित्र केवळ मोठ्या शहरांतच नव्हे तर लहान गावातही दिसत असल्याचे लपून नाही. दोन वर्षांपूर्वी वर्धा जिल्ह्यातील काही तालुक्यात बेटिंग करणाऱ्या टोळ्या पकडण्यात आल्या होत्या. हा तसाच पण थोडा वेगळा किस्सा. दुबईत आयसीसी चॅम्पियन साठी भारत विरुद्ध न्यूझीलंड असा सामना गाजणार होता. त्यावर मोठ्या प्रमाणात सट्टा खेळल्या गेल्याचा हा गुन्हा.
या दिवशी पोलीस पथक गस्त घालत असतांना स्थानिक सिद्धार्थनगर येथील विशाल उर्फ डॉक्टर प्रमोद मून हा त्याच्या घरून क्रिकेट सामन्यावर सट्टा खेळत असल्याचे माहित पडले. लगेच छापा मारून त्यास पकडण्यात आले. घरात बसून तो या अंतिम सामन्यावर मोबाइलवर ऑनलाईन माध्यमातून जुगार लावत होता. मोबाईलमध्ये एक अँप डाउनलोड होते. विविध आयडीवर त्याने स्वतःचे युजर नेम व पासवर्ड तयार केले होते. त्या माध्यमातून त्याने अंतिम सामना जुगार खेळण्यास निवडला. तसेच आयडी बनवून ग्राहकांना विकायचा.
डॉक्टर उर्फ विशाल मून हा या बेटिंग साठी समतानगर येथील अक्षय मेंढे याच्या संपर्कात होता. तो ग्राहकांना आयडी ऑनलाईन तयार करून देत होता. विशाल मोबदल्यात तीन टक्के पैसा जुगारातून देत असे. तसेच दयालनगर येथील योगेश पंजवानी याच्याकडे पैश्याचे सर्व व्यवहार होत असल्याची माहिती त्याला नंतर ताब्यात घेतल्यावर पुढे आली आहे. आता या बेटिंग व्यवहारातील सर्व तिघांना अटक झाली असून गुन्हे दाखल करण्यात आले आहे. आरोपी बुकीकडून एक कार, रोख रक्कम व तीन मोबाईल जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक अमोल लगड, गजानन लामसे, चंद्रकांत बुरंगे भूषण निघोट, मनीष कांबळे, अमोल नगराळे, मंगेश आदे, दीपक साठे, प्रफुल्ल पुनवटकर, अक्षय राऊत, अनुप कावळे यांच्या चमुने सापळा रचून फत्ते केली. या व्यवहारात लाखो रुपयाची उलाढाल बेटिंग माध्यमातून झाल्याची चर्चा होते. विशेष म्हणजे हा बेकायदेशीर प्रकार उघड होवू नये म्हणून सट्टा लावणाऱ्या ग्राहकांना स्वतंत्र आयडी तयार करून देण्याची शक्कल आरोपीनी लावली. या टोळीचे अन्य मोठ्या शहरातील सट्टेबाज टोळीशी लागेबांधे होते काय, हे पण तपासल्या जात आहे. गुन्हा उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.