नागपूर : पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पतीनेच नावाच्या मदतीने पत्नीची हत्या केली. पतीने पत्नीचे हातपाय बांधून ठेवले तर त्याच्या भावाने डोक्यावर रॉड मारला. पत्नीचा खून केल्यानंतर दोघांनीही घरातून पळ काढला. ही घटना बुधवारी सायंकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. डॉ. अर्चना राहुले (५०, लाडीकर लेआउट) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर डॉ. अनिल राहुले आणि रवी राहुले अशी आरोपी भावंडांची नाव आहेत. आरोपींना चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

डॉ.अर्चना राहुले या मेडिकल रुग्णालयात फिजिओथेरपीस्ट विभागात सहाय्यक प्राध्यापक होत्या. ३१ ऑगस्टला त्यांचा पन्नासवा वाढदिवस कुटुंबातील सदस्यांनी मोठ्या थाटात साजरा केला होता. पती डॉ. अनिल (५२) हा छत्तीसगड-रायपूर येथे वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर आहे. तर त्यांचा भाऊ राजू राहुले (५६) खैरलांजी, साकोली येथे राहतो. शेती सोबतच तो शिकवणी वर्ग चालवितो. अनिलला एक मुलगा असून तो तेलंगाना राज्यातील करीमनगर येथे एमबीबीएसच्या तिसऱ्या वर्षाला शिकतो. डॉ. अनिल हा दर शनिवारी आणि रविवारी रायपूरमधून नागपुरातील घरी येत होता. अलिकडे अर्चनाच्या वागण्यात बदल झाला, असा आरोप करून तिच्याशी भांडण करायचा. तिच्या कुणाशीतरी अनैतिक संबंध असल्याचा आरोप करीत होता.  तिच्या चारित्र्यावरही संशय घेत होता. यावरून त्यांच्यात गेल्या पाच महिन्यांपासून वाद होता. आई बाबांचे पटत नाही, याची मुलालाही कुणकुण होती. पती छत्तीसगढला आणि मुलगा तेलंगाना येथे असल्याने पत्नी अर्चना एकट्याच राहात असल्या तरी त्यांचा परिसरातील लोकांशी फारसा संबध नव्हता. 

कायमचा संपविण्याची आखली योजना

अनिलने त्याचा भाऊ राजूला विश्वासात घेतले. पत्नीच्या अनैतिक संबंधाला कंटाळून अर्चनाचा खून करण्याचा कट रचला. योजनेनुसार ९ एप्रिलला अनिल भावासोबत नागपुरात आला. पत्नी अर्चनाला अनिलने खाली पाडले. तिचे हातपाय बांधले आणि राजूने तिच्या डोक्यावर रॉडने वार केले. तिचा मृत्यू झाला, याची खात्री पटल्यानंतर दोघेही आपआपल्या गावी निघून गेले.

खून झाल्याचा केला बनाव

शनिवारच्या रात्री अनिल घरी आला. दार उघडले आणि आता गेला. क्षणभरातच मोठ-मोठ्याने रडत घराबाहेर आला. शेजाऱ्यांनी विचारपूस केली असता अज्ञात व्यक्तीने अर्चनाची हत्या केल्याचे त्याने सांगितले. पाहता पाहता परिसरातील नागरिकांची गर्दी झाली. शेजारच्यांनी लगेच पोलिस नियंत्रण कक्षाला माहिती दिली. वपोनि भेदोडकर पथकासह घटनास्थळी पोहोचले. घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविला. दरम्यान न्याय वैद्यक प्रयोग शाळेच्या पथकालाही पाचारण करण्यात आले. त्यांनी घटनास्थळावरील नमुने घेतले. पतीने पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्नही आरोपीने केला.