मेयो रुग्णालयातील प्रकाराने खळबळ
येथील इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) येथे रुग्णांच्या नातेवाईकांच्या हातावर चक्क औषधी लिहून (प्रिस्क्रिप्शन) दिल्याचा प्रकार पुढे आला आहे. हा प्रकार येथील डॉक्टरांनी केला की परिसरातील असामाजिक तत्त्वांनी मेयोला बदनाम करण्यासाठी केला हे प्रशासनाने गठीत केलेल्या समितीच्या अहवालावरून स्पष्ट होईल.
मेयो वा कोणत्याही शासकीय व खासगी डॉक्टरांनी बाहेरून औषधी लिहून देताना स्वत:चा स्वाक्षरी सोबतच स्टॅम्प मारणे अपेक्षित आहे. परंतु मेयो रुग्णालयातील नातेवाईकांच्या हाती औषध लिहून देण्याच्या पद्धतीने या नियमाच्या अंमलबजावणीवर प्रश्न उपस्थित झाला आहे.
मेयो रुग्णालयातील औषधी तुटवड्याचा तिढा अद्यापही कायम आहे. मेयो आणि राज्यातील इतरही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांमधील औषधांची समस्या निकाली काढण्यासाठी शासनाने स्थानिक पातळीवर औषधी खरेदीचे अधिकार १० टक्क्यांवरून ३० टक्के केले. त्यानंतरही येथील औषधांची समस्या सुटलेली नाही.
हेही वाचा >>> कोट्यवधींचा भ्रष्टाचार; डझनभर अधिकारी दोषी तरीही कारवाई नाही, तक्रारकर्ते उपोषणावर
त्यातच फेब्रुवारी २०२३ ला नागपुर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनन केलेल्या स्टिंग ऑपरेशनमध्ये मेयोच्या परिसरात बेकायदेशीर औषधांची विक्री करणाऱ्या एका तरुणाला पकडून तहसील पोलिसांच्या ताब्यात दिले होते. त्यावर रुग्णालय प्रशासनाकडून चौकशी केली गेली. परंतु पुन्हा ही घटना घडल्याने मेयोच्या कारभारावर प्रश्न उपस्थित झाले आहे.
मेयो प्रशासनाने या प्रकरणातही चौकशी सुरू केली आहे. मेयो रुग्णालयासमोरील दोन मेडिकल स्टोअर्सने हातावर औषध लिहून आलेल्या नातेवाईकांना औषधी देण्यास नकार दिल्याचा दावा होत असून तिथूनच हे प्रकरण पुढे आल्याचे बोलले जात आहे.
“डॉक्टरांना कागदावर स्वतःचा नोंदणी क्रमांक लिहूनच औषध देण्याच्या सूचना आहे. या प्रकरणात एकाही डॉक्टरने अद्याप औषध हातावर लिहिल्याचे मान्य केले नाही. चौकशी सुरू आहे. त्यात कुणी जवाबदार असल्यास कारवाई होईल. तसेच हे कृत्य इतर कुणी मेयोला बदनाम करण्यासाठी केले काय, हे सुध्दा तपासले जाईल”
–डॉ. संजय बिजवे, अधिष्ठाता, मेयो रुग्णालय, नागपूर