नागपूर: नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयाच्या अधिष्ठातापदी नागपूरचे डॉ. अभय दातारकर आहेत. आता शासनाने विभागीय पदोन्नतीने डॉ. वसुंधरा भड यांची मुंबईच्या तर डॉ. माया इंदूरकर यांची औरंगाबादच्या अधिष्ठातापदी नियुक्ती केली आहे. त्याही नागपूरच्या आहेत. त्यामुळे आता राज्यभरातील सर्व शासकीय दंत महाविद्यालयांवर नागपूरचा झेंडा रोवला गेला आहे.
प्रा. डॉ. अभय दातारकर यांनी करोना काळात महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण केली होती. त्यामुळे शासनाने त्यांना नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयातील अधिष्ठातापदाची सूत्रे दिली. शासनाने मुंबई आणि औरंगाबादच्या शासकीय दंत महाविद्यालयांतील अधिष्ठातापदासाठी विभागीय पदोन्नती केली.
हेही वाचा… रिमझिम पावसाने वाशिम जिल्हा चिंब; कुठे दमदार तर कुठे तुरळक पाऊस!
नागपूरच्या शासकीय दंत महाविद्यालयात कार्यरत प्रा. डॉ. वसुंधरा भड यांची मुंबईच्या आणि नागपुरातच शिकलेल्या आणि सध्या औरंगाबादला कार्यरत असलेल्या डॉ. माया इंदूरकर यांची औरंगाबादच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली. दोघींनीही आपल्या पदाची सूत्रे स्वीकारली. या सर्व महाविद्यालयांवर देखरेखीची जबाबदारी असलेले दंतच्या सहसंचालक पदावरही नागपूरचे डॉ. विवेक पाखमोडे कार्यरत आहेत.