महेश बोकडे, लोकसत्ता
नागपूर: नागपूरसह विदर्भातील अकरा जिल्ह्यांमध्ये डोळ्यांची साथ असल्याने येथील डॉक्टर-आरोग्य कर्मचारीही त्याच्या विळख्यात सापडले आहेत. शस्त्रक्रियेला येणाऱ्या रुग्णांचे डोळे आल्याचे मोठ्या प्रमाणात पुढे येत असल्याने येथील मोतीबिंदूसह डोळ्यांच्या इतर शस्त्रक्रिया निम्म्याने घटल्या आहेत.
विदर्भासह राज्यातील अनेक भागांत डोळे येण्याची साथ मोठ्या प्रमाणात सुरू आहे. विदर्भातील सर्व शासकीय व खासगी नेत्ररोग तज्ज्ञांकडे या रुग्णांची गर्दी दिसून येत आहे. दरम्यान, या रुग्णांवर उपचार करतानाच नागपुरातील मेडिकल, मेयोसह यवतमाळ, अकोला, चंद्रपूर या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचारीही डोळ्यांच्या साथीच्या विळख्यात सापडत आहेत.
आणखी वाचा-मेडिकल, मेयो, आयुर्वेदमधील १ हजार कोटींच्या प्रकल्पांवर मंथन
मेयोच्या नेत्ररोग विभागाचे प्रमुख डॉ. राहुल डगवार म्हणाले, मेयो रुग्णालयातील नेत्ररोग विभागात सुमारे १५ निवासी डॉक्टर असून त्यापैकी पाच जण उत्तीर्ण होऊन निघून गेले. या सगळ्यांचेच डोळे आले आहेत. तर शिक्षकांपैकीही काहींचे डोळे आले. येथील नर्सिंगसह इतर विभागातील डॉक्टर-कर्मचाऱ्यांनाही डोळ्याच्या साथीने विळख्यात घेतले. दरम्यान, सोमवारी येथे ९ मोतीबिंदू शस्त्रक्रियांचे नियोजन होते. परंतु तिघांचे डोळे आल्याचे पुढे आल्याने त्यांची शस्त्रक्रिया स्थगित केली गेली. हा प्रकार सातत्याने होत आहे. मेडिकलच्या नेत्ररोग विभागाच्या प्रमुख डॉ. मीनल येरावार म्हणाल्या, मेडिकलमध्ये आजपर्यंत सुमारे १५ निवासी डॉक्टरांचे डोळे आले. शिक्षकांनी योग्य काळजी घेतल्याने तूर्तास त्यांच्यात आजार नाही. परंतु इतर विभागातीलही बरेच डॉक्टर-कर्मचारी या आजाराने संक्रमित होत आहेत. येथे डोळे आलेले रुग्ण आढळल्यास इतर प्रतीक्षा यादीतील रुग्णांचा क्रमांक लागत असल्याने शस्त्रक्रिया कमी नाही.
चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद फुलपाटील म्हणाले, येथेही मोठ्या प्रमाणात डॉक्टर-कर्मचाऱ्यांचे डोळे आले आहे. रुग्ण वाढल्याने शस्त्रक्रिया कमी झाल्या आहेत. चंद्रपूरला मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी सार्वजनिक आरोग्य विभाग व वैद्यकीय शिक्षण खात्याचे वेगवेगळे युनिट आहे. सध्या आरोग्य विभागाच्या शस्त्रक्रिया थांबवल्या गेल्या असल्या तरी वैद्यकीय शिक्षण खात्याकडून मात्र केल्या जात आहेत.